...आणि अपंग रुग्ण येथून चालत जातात!

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

आज तपासणी झाली... उद्या मोजमाप घेतले जाईल... आठवड्याने तुमच्यासाठीचा जयपूर फूट मिळेल... असा कसलाही सरकारी वेळकाढूपणाचा सूर नाही... जागेवरच तपासणी, तेथेच मोजमाप अन्‌ काही वेळातच तयार जयपूर फूट पायात घालून चक्क चालत निघायचे!

सोलापूर - आज तपासणी झाली... उद्या मोजमाप घेतले जाईल... आठवड्याने तुमच्यासाठीचा जयपूर फूट मिळेल... असा कसलाही सरकारी वेळकाढूपणाचा सूर नाही... जागेवरच तपासणी, तेथेच मोजमाप अन्‌ काही वेळातच तयार जयपूर फूट पायात घालून चक्क चालत निघायचे! ही किमया होत आहे... सोलापूरच्या लोकमंगल जीवन हॉस्पिटलच्या आवारात. कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी न आणता रुग्णाला सुखद धक्का दिला जातो.

ऐकून नवल वाटल्याने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच डोळ्यावर विश्‍वास बसला. लोकमंगल फाऊंडेशनने मुंबईच्या भगवान महावीर विकलांग सहायता समितीच्या सहकार्याने भारतीय साधारण विमा निगमच्या सीएसआरचा निधीचा उपयोग करीत वेगळ्याच पद्धतीच्या आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सकाळी रुग्ण येतो. त्याची नोंदणी केल्यानंतर त्याची तपासणी व नंतर पायाचे मोजमाप घेतले जाते. त्याचवेळी त्याच्या चहापाण्याची व्यवस्था पाहिली जाते. नंतर दुपारी भोजनाचीही व्यवस्था आपुलकीने केली जाते. या दरम्यान त्याच्या मापाचे जयपूर फूट, कॅलिपर किंवा कुबड्या यापैकी त्याच्यासाठी ज्या काही उपयुक्त साहित्याची गरज असेल त्याची तेथेच तयारी केली जाते. यासाठी जयपूरहून खास पथक आले आहे. दिवसभरात त्यांच्याकडून शंभराहून अधिक जयपूर फूटची तयारी होते. ज्या रुग्णाला त्याच्या पायाच्या मोजमापाचे जयपूर फूट मिळते, तो संध्याकाळी खुशीत नवे जयपूर फूट घालून चक्क चालत घरी परततो. जयपूर फूटबरोबर एका चांगल्या कंपनीचा बुटही दिला जातो. यासाठी कसलीही आकारणी केली जात नाही. एक पैही न खर्च करता या शिबिरात दररोज शेकड्याने अशा रुग्णांना लाभ मिळत आहे. यासाठी त्याच्याकडून आधारकार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र व फोटो बस्स इतकीच कागदपत्रे मागितली जातात.

सोलापूर शहर, जिल्ह्याबरोबरच या शिबिराचा राज्यभरातील रुग्ण लाभ घेत आहेत. शेजारच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही रुग्णांची रेलचेल वाढलेली दिसत आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण या शिबिराचा लाभ घेत आहेत. 28 मार्चपर्यंत हे शिबिर चालणार आहे.

आशेचा किरण
लोकमंगल फाऊंडेशनच्या या शिबिरात जयफूर फूट, कॅलिपर्स, कुबड्या, तीन चाकी सायकल, व्हिल चेअर, कानाचे मशिन अशा साहित्याचे वाटप होत आहे. यामुळे भारतीय साधारण विमा निगमच्या सीएसआरमुळे अनेक विकलांगांच्या जीवनात आशेचा एक किरण दिसू लागला आहे.

Web Title: Success story of Solapur's Lokmangal Jeevan Hospital