ग्रीन कॉरिडॉरद्वारे कोल्हापुरात सातव्यांदा यशस्वी अवयवदान

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

आधार हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या मीनल शहा यांचे यकृत (लिव्हर), फुप्फुस, डोळे, किडनी असे अवयव दान केले. यातील काही अवयव जहाँगीर व ससून हॉस्पिटल- पुणे व ग्लोबल हॉस्पिटल- मुंबई व एक अवयव नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलकडे पाठविला. शहा यांच्या अवयवदानामुळे चौघांचे प्राण वाचणार

कोल्हापूर - धरमतर ग्रुपचे मितूर प्रवीणकांत शहा यांच्या पत्नी मीनल शहा (वय ५३) यांना मेंदूत रक्तस्रावामुळे उपचारासाठी ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र त्यांच्या मेंदूचे कार्य थांबल्याने शहा परिवाराने मीनल यांचे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार चार अवयवांचे आज दान केले. हे अवयव प्रत्यारोपणासाठी मुंबई, पुणे व कोल्हापूर येथील रुग्णांलयाकडे ग्रीन कॉरिडॉरद्वारे नेले. 

ॲस्टर आधार ते विमानतळ मार्गावर तसेच कोल्हापूर - पुणे महामार्गावर ग्रीन कॉरिडॉर केला आणि ॲस्टरमध्ये सातव्यांदा यशस्वी अवयवदानाचा उपक्रम झाल्याची माहिती ॲस्टर आधारचे संचालक डॉ. उल्हास दामले यांनी दिली.

सकाळी सहापासूनच तयारी

धरमतर ग्रुप या नावाने शहा परिवार व्यापार-उद्योग क्षेत्रात ओळखला जातो. याच परिवारातील मीनल यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. याबाबत डॉक्‍टरांनी शहा परिवाराला माहिती दिली. त्यानंतर शहा परिवाराने मीनल यांच्या अवयवांचे दान करण्याची इच्छा व्यक्त केली. सकाळी सहापासूनच अवयवदानाची तयारी सुरू झाली. त्यासाठी तज्ज्ञांचे पथक दाखल झाले. अवयवांची चाचणी, तसेच ज्याला अवयव प्रत्यारोपण करावयाचे आहे त्याची वैद्यकीय माहिती याचे पृथक्करण प्रक्रिया दुपारी एकपर्यंत सुरू होती. तोपर्यंत वाहतूक पोलिसांनी ॲस्टर आधार ते उजळाईवाडी विमानतळ मार्गावर ग्रीन कॉरिडॉरची तयारी केली.

वैद्यकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर अवयव मुंबई-पुणे येथील रुग्णालयात नेण्याची तयारी केली. त्यानुसार वैद्यकीय पथकाने अवयव सुरक्षितरीत्या बंदिस्त पेट्यांत ठेवले. त्यांतील एक पेटी व एक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक एका स्वतंत्र रुग्णवाहिकेतून दुपारी तीन वाजता पुण्याकडे रवाना झाले; तर दुसरी पेटी विमानाद्वारे मुंबईकडे नेली.

चौघांना जिवदान मिळणार
आधार हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या मीनल शहा यांचे यकृत (लिव्हर), फुप्फुस, डोळे, किडनी असे अवयव दान केले. यातील काही अवयव जहाँगीर व ससून हॉस्पिटल- पुणे व ग्लोबल हॉस्पिटल- मुंबई व एक अवयव नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलकडे पाठविला. शहा यांच्या अवयवदानामुळे चौघांचे प्राण वाचणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful Body Component Donation In Kolhapur via Green Corridor