"जवान हूँ नादान नही' 

"जवान हूँ नादान नही' 

सोलापूर ः अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा यंदाचा समाजकार्य पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यातील शहाजी गडहिरे यांना जाहीर झाला आहे. वर्ष संपत असताना सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आली. श्री. गडहिरे यांच्या गेल्या 25 वर्षांच्या अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, युवक, एकल महिला आदींसाठी केलेल्या सामाजिक कार्याची घेतलेली ही दखल आहे. त्यांच्या संस्थेने राबविलेला "जवान हूँ नादान नही' हा उपक्रम विशेष चर्चेत राहिला. त्यांच्या एकूण सामाजिक कामाविषयी.... 

शहाजी गडहिरे यांचे मूळ गाव सांगोला तालुक्‍यातील वाणीचिंचाळे हे आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. सांगोल्यात कॉलेजमध्ये पदवीच्या पहिल्या वर्षाला असतानाच त्यांनी मुंबईतील युवा संस्थेसोबत काम केले. साधारण 10 वर्षे विविध सामाजिक संस्थांसोबत काम केल्यानंतर आपण कुणासाठी आणि कुठे काम करायचे, याची वैचारिक स्पष्टता आल्यानंतर त्यांनी 2003 मध्ये अस्तित्व नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून सांगोला तालुक्‍यातील दलित अल्पभूधारक शेतकरी, एकल महिला यांच्या विकासासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले आहेत. सततच्या दुष्काळाचा फटका गरीब कुटुंबांना बसतो म्हणून सांगोला तालुक्‍यातील अनेक गावांत त्यांनी धान्य बॅंक, वॉटर बॅंक, तसेच सायकल बॅंक असे उपक्रम राबविले आहेत. आपला उपक्रम समाजातील शेवटच्या घटकाच्या उपयोगी पडावा, हा त्यांचा ध्यास असतो. 


नऊ गावांत डिजिटल सखी... 
सध्या अस्तित्व व अफार्म संस्थेच्या माध्यमातून सोलापूर परिसरातील नऊ गावांतील 350 महिलांना उद्योजकता विकास आणि डिजिटल सखी प्रशिक्षण दिले जात आहे. डिजिटल व्यवहारांसाठी महिलांचे प्रशिक्षण व्हावे, यासाठी डिजिटल सखी हा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिलांना लघुउद्योजक बनविणे हा उद्देश आहे. सध्या 360 महिला प्रशिक्षण घेत असून लघुउद्योजक बनण्याच्या प्रक्रियेत आहेत. मोलमजुरी करणाऱ्या महिला सध्या कुक्कुटपालन, शेळीपालन, शिवणकाम असे व्यवसाय करण्याबरोबरच या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशाचा व्यवहार रोकडरहित करीत आहेत. 

सायकल बॅंकेचा उपक्रम.... 
सोलापूर जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या दुष्काळी भागात विशेषतः सांगोला आणि मंगळवेढा तालुक्‍यात दुष्काळ निर्मूलनासाठी त्यांनी डोह मॉडेल राबविले आहे. हे डोह मॉडेल शेतकऱ्यांसाठी अतिशय प्रभावी ठरत आहे, असे त्यांनी सांगितले. सततच्या दुष्काळी परिस्थितीला पर्याय म्हणून त्यांनी महिलांना शेतीपूरक व्यवसाय तसेच अन्य व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले. व्यवसायनिधी उपलब्ध करून देऊन 500 पेक्षा जास्त महिलांना उद्योजक बनविले. सांगोला, मंगळवेढा तालुक्‍यात अनेक गावांतील दलित, वतनी इमानी जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी गडहिरे यांनी योगदान दिले आहे. 

स्त्री-पुरुष समानतेसाठी... 
प्रबोधनाचे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. त्यातला स्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषांसोबत काम अर्थात समजदार जोडीदार हा एक प्रकल्प होता. 2010 ते 2015 या दरम्यान तो राबविण्यात आला. सर्व प्रकारच्या संसाधनांवर पुरुषांइतकीच महिलांची मालकी प्रस्थापित करणे, महिलांच्या प्रजनन आरोग्यामध्ये पुरुषांचा सहभाग वाढविणे हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्देश होते. या प्रकल्पात सांगोला व मंगळवेढा तालुक्‍यातील 20 गावांतील 600 युवक सहभागी झाले होते. या प्रकल्पांतर्गत युवक व पुरुषाची मर्द, मर्दांगीची कल्पना, मर्दांगीचे समाजजीवनावर होणारे परिणाम, हिंसा, हिंसेचे स्वरूप व पद्धत अशा अनेक विषयांवर युवक व पुरुषांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून युवकांत सकारात्मक बदल झाला. स्वयंपाकात मदत करणे, आजारपणात बायकोची काळजी घेणे, मुलांचे संगोपन करणे अशा कामांत अनेकजण मनापासून सहभागी झाले. 

"जवान हूँ नादान नही' 
या प्रकल्पात असलेल्या महादेव बजबळकर यांची अमीर खान यांच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात पती-पत्नीसह मुलाखत झाली होती. सांगोला तालुक्‍यात हे अभियान राबवून अनेक घरे पती-पत्नीच्या संयुक्त नावे करण्यात आली. हे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या, पण तरीही हे काम खऱ्या अर्थाने रचनात्मक काम झाले आहे, असे शहाजी गडहिरे आवर्जून सांगतात. त्याचबरोबर "जवान हूँ नादान नही' हे अभियानही त्यांच्या संस्थेने राबविले. युवकांना एड्‌ससारख्या रोगांपासून सावध करणे, त्यांच्या वर्तणुकीत बदल करणे, संवाद कौशल्य वाढविणे यातून युवकांना चांगला नागरिक म्हणून तयार करणे हा उद्देश होता. हे काम साधारण पाच हजार युवकांबरोबर संस्थेने केले. 

"पुरस्कार सहकाऱ्यांचा' 
अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनकडून मिळत असलेला पुरस्कार माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा आहे. आम्ही अनेक कामे करत आहोत, पण त्यातले सायकल बॅंकेचे काम महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण लवकरच थांबते. त्याला अनेक कारणे असतात. त्यातले शाळा घरापासून लांब असणे, हे एक कारण असते. या मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे म्हणून संस्थेने सायकल बॅंकेचा उपक्रम राबविला. या उपक्रमातून अनेक मुली बारावीपर्यंत शिकल्या. शिक्षण थांबले तर अल्पवयात लग्न होते. त्यावर आळा बसला. यापुढेही सांगोला तालुक्‍यातील सर्वसामान्यांच्या विकासासाठी जोमाने कार्यरत राहू, असे शहाजी गडहिरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com