सांगली : पाच वर्षांत ऊस क्षेत्र ३५ टक्के वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugarcane

सांगली : पाच वर्षांत ऊस क्षेत्र ३५ टक्के वाढले

सांगली - जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात सिंचन योजनांचे पाणी पोहोचल्यामुळे उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल ३५ टक्के क्षेत्रात वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये ८० हजार १७६ हेक्टर क्षेत्र होते; ते २०२१-२२ मध्ये १ लाख २२ हजार ८६९ हेक्टर क्षेत्र झालेले आहे. याच वर्षी हंगाम उशिरापर्यंत चालला. पुढील वर्षी ऊस वेळेवर नव्हे; तर गाळपाचाच प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात नदीकाठासह दुष्काळी पट्ट्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात वाढतेय. २०२२-२३ साठी गाळपासाठी १ लाख २४ हजार २६९ हेक्टरवरील ऊस उपलब्ध होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ हजार २९२ हेक्टर क्षेत्रात वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून उसाच्या क्षेत्र वाढ असल्याचे दिसते आहे. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका उसाला बसला तरी शेतकरी लागवडीसाठी पुढे येत आहेत. २०२२-२३ च्या गाळप हंगामासाठी जिल्ह्यात दोन हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे, परंतु शिराळा, खानापूर आणि जत या तीन तालुक्यांतील उसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. खानापूर, तासगाव तालुक्यांत सध्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ऊस क्षेत्र कमी आहे. मात्र, त्याठिकाणचे शेतकरी ऊस नोंदणीसाठी पुढे आले नसल्याचे कारखान्यांनी स्पष्ट केले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात महांकाली साखर कारखाना आहे, तरीही येथील शेतकरी उसाकडे वळालेत. गतवर्षी ३ हजार ०७० हेक्टर क्षेत्र होते.

चालू वर्षात गाळप झालेले उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

आडसाली ३९ हजार ३१४

पूर्व हंगामी २० हजार ८७०

सुरू १५ हजार ५२७

खोडवा ४६ हजार २६५

एकूण १ लाख २१ हजार ९७७