लाकडी ओंडका डोक्यात घालून अवचितवाडीत ऊसतोडणी मजूराचा खून | Murder | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Jamunkar
लाकडी ओंडका डोक्यात घालून अवचितवाडीत ऊसतोडणी मजूराचा खून

लाकडी ओंडका डोक्यात घालून अवचितवाडीत ऊसतोडणी मजूराचा खून

मुरगूड - अवचितवाडी, (ता. कागल) येथे भावाशी भांडत असल्याच्या रागातून लाकडी ओंढका डोक्यात घातल्याने ऊसतोडणी मजूराचा खून झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. संजय फुलचंद जामुणकर, (रा. वारी हनुमान, भैरोगड, ता. तिल्हारा, जि. अकोला) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलीसांत झाली असून याप्रकरणी संशयीत आरोपी सुनिल नंदुलाल मावसकर याला पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांतून मिळालेली माहिती अशी, अवचितवाडी, (ता. कागल) येथील विनायक शंकर मोरबाळे यांच्या ट्रॅक्टवर ऊस तोडणीसाठी एक महिन्यापूर्वी भैरोगड, (ता. तिल्हारा, जि. अकोला) येथील १३ कुटुंबाची टोळी (ज्यामध्ये १३ महिला व १३ पुरुषांचा समावेश होता.) आलेली आहे. हे सर्वजन गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विनायक मोरबाळे यांच्या मालकीच्या कटी नावाच्या शेतामध्ये (गट नंबर ५८ ) वेगवेगळया खोपटामध्ये राहत आहेत. सुनिल नंदुलाल मावसकर, (रा. वारी हनुमान, भैरोगड, ता. तिल्हारा, जि. अकोला) व संजय फुलचंद जामुणकर, (रा. वारी हनुमान, भैरोगड, ता. तिल्हारा, जि. अकोला) हे दोघेही याच ठिकाणी राहत होते. ते एकाच गावचे असल्याने एकमेकांचे चांगले मित्रही होते. सोमवारी ऊस तोडणीच्या कामावरुन आल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सुनिल मावसकर याचा भाऊ अनिल याच्याशी संजय जामुणकर याचे भांडण सुरु होते. त्यावेळी तिथे सुनिल मावसकर आला व त्याने संजला "तु मेरे भाई के साथ क्यों लड रहा है" अशी विचारणा केली. यातून दोघांमध्ये वाद सुरु झाला.

हेही वाचा: ओवैसींनी सांगितलं शिवसेनेचं भविष्य; म्हणाले, '2024 साली शिवसेना नक्कीच...'

वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात सुनिलने संजय फुलचंद जामुणकर याच्या डोक्यात शेजारीच पडलेला लाकडी ओंढका हातात घेवून घातला. डोक्यात जोराचा मार लागल्याने संजय क्षणार्धात खाली कोसळला व बेशुद्धावस्थेत पडला. ही घटना तिथेच राहणाऱ्यांमधील कोणीतरी टोळी मालक विनायक मोरबाळे यांना फोनवरुन कळवली. त्यामुळे तातडीने मोरबाळे घटनास्थळी आले. त्यांनी संजयला बेशुद्धावस्थेत पडलेला बघून चारचाकीतून त्याला मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. पण तो उपचारापुर्वीच मयत झालेचे डॉक्टरांनी सांगितले. संजय मयत झाल्याची खात्री होताच याबाबतची माहिती विनायक मोरबाळे यांनी मुरगूड पोलीसांत दिली. शवविच्छेदना नंतर मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संजय जामुणकर यांचे आई - वडील, पत्नी तसेच त्याची तीन लहान मुलेही ऊसतोडणीसाठी सोबत आलेली आहेत. मंगळवारी पहाटे मृतदेह रुग्णवाहिकेतून वारी हनुमान, भैरोगड, ता. तिल्हारा येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीसांनी संशयीत आरोपी सुनिल नंदुलाल मावसकर याला अटक केली आहे. अधिक तपास मुरगूड पोलीस करीत आहेत.

loading image
go to top