esakal | 'ऊस वाहतूकदारांचे प्रश्‍न न सोडवल्यास हंगाम बंद'; शेट्टींचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetti

राज्यामध्ये एकूण ९ लाख ऊसतोडणी मजूर आहेत. या मजुरांची मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होते.

'ऊस वाहतूकदारांचे प्रश्‍न न सोडवल्यास हंगाम बंद'; शेट्टींचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : राज्यातील साखर कारखानदारी ऊस वाहतूकदारांच्या मजबूत खांद्यावरती तारलेली आहे. वाहतूकदारांसमोर आज संकट उभे राहिल्यामुळे त्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. वाहतूकदारांची चाके ज्यादिवशी थांबतील त्यादिवशी राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारी मातीमोल होईल. यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा राज्यातील सर्व ऊस वाहतूकदार डिसेंबर व जानेवारीमध्ये कारखान्यांचा गळीत हंगाम बंद करतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे दिला.

सांगलीतील मार्केट यार्डातील सहकार भवनमध्ये आज ऊस वाहतूकदार संघटनेचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, संजय बेले, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, पंचायत समिती सदस्य राहुल सकळे आदिंची उपस्थिती होती.

हेही वाचा: भाजप नेते सामंतांच्या भेटीला ; राजकीय चर्चेला उधान

शेट्टी म्हणाले, ‘‘साखर उद्योगामध्ये ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या राज्य साखर संघाने आजपर्यंत कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. राज्यामध्ये एकूण ९ लाख ऊसतोडणी मजूर आहेत. या मजुरांची मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. हे मजूर व वाहतूकदार म्हणजे साखर उद्योगातील कणा असूनही साखर संघाने व सरकारने त्यांच्या दुर्लक्ष केले आहे. त्यांना उपेक्षित ठेवले आहे. ऊसतोडणी मजुरांचे महामंडळ करण्याची मागणी राज्यात पहिल्यांदा २००७ मध्ये विधानसभेत केली होती. त्याकडे दुर्लक्ष केले.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘सरकारने काही वर्षांपूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळांची स्थापना केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसातून वर्षाला १०० कोटी रुपयांचा निधी कपात करून महामंडळाला ऊर्जितावस्था आणलेली आहे. मात्र महामंडळाचे कामकाज कशापद्धतीने होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. ऊस वाहतूकदारांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमून त्याची कार्यपद्धती निश्चित केली पाहिजे. महामंडळाकडून ऊस तोडणी मजुरांना बांधकाम कामगारांप्रमाणे आरोग्य विमा, पेन्शन, साहित्य पुरवठा, कायदेशीररीत्या सरंक्षण दिले पाहिजे. महामंडळाकडे मजुरांची नोंदणी करून वाहतूकदारांना महामंडळाकडून मजूर पुरवठा केल्यास वाहतुकदारांची फसवणूक होणार नाही.’’

हेही वाचा: स्किन टोन सुधाराचाय? जाणून घ्या 'या' महत्वाची टिप्स

मेळाव्यास धनाजी पाटील, माधव पाटील,भागवत जाधव, बाबा सांद्रे, सुभाष साळुंखे, श्रीपाल वडगावे, नामदेव सोन्नूर, ललन मिठारे, धनाजी पाटील, मनोज साळुंखे, प्रदीप चौगुले, शिवाजीराव माने-देशमुख यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील ऊस वाहतूकदार उपस्थित होते.

loading image
go to top