ऊसदराचा मुद्दा गाजण्याची चिन्हे

- भारत नागणे
मंगळवार, 10 जानेवारी 2017

पंढरपूर - इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या वाखरी (ता. पंढरपूर) जिल्हा परिषद गटात भालके-काळे आणि परिचारक या दोन्ही प्रतिस्पर्धी गटांकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. दरम्यान, वाखरी गटामध्ये भीमा नदीकाठच्या ऊसपट्ट्यातील गावांचा समावेश असल्याने या निवडणुकीमध्ये ऊसदराचा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत.

पंढरपूर - इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या वाखरी (ता. पंढरपूर) जिल्हा परिषद गटात भालके-काळे आणि परिचारक या दोन्ही प्रतिस्पर्धी गटांकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. दरम्यान, वाखरी गटामध्ये भीमा नदीकाठच्या ऊसपट्ट्यातील गावांचा समावेश असल्याने या निवडणुकीमध्ये ऊसदराचा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत.

पूर्वीचा गुरसाळे जिल्हा परिषद गट रद्द होऊन त्या ठिकाणी वाखरी जिल्हा परिषद गट निर्माण झाला आहे. या गटामध्ये वाखरी आणि पिराची कुरोली असे दोन पंचायत समितीचे गण आहेत. वाखरी जिल्हा परिषद गट ओबीसीसाठी राखीव आहे. याच गटातील वाखरी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे. तर पिराची कुरोली गण पुरुषांसाठी खुला आहे. मागील निवडणुकीत भालके-काळे गटाच्या संगीता ननवरे या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या होत्या. विरोधी परिचारक गटाच्या शकुंतला कांबळे यांचा अवघ्या 500 मतांनी पराभव झाला होता. तर वाखरी पंचायत समिती गणातून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि परिचारक गटाचे विद्यमान उपसभापती विष्णू बागल यांनी काळे गटाचे उमेदवार मोहन नागटिळक यांचा अवघ्या 140 मतांनी पराभव करून स्वाभिमानीचा झेंडा फडकावला होता.

मागील पाच वर्षांनंतर वाखरी गटामध्ये अनेक राजकीय बदल झाले आहेत. वाखरी जिल्हा परिषद गटातील महत्त्वाच्या भंडीशेगाव ग्रामपंचायतीवर भालके-काळे आणि परिचारक गटाच्या सत्तेला सुरुंग लावत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वर्चस्व मिळवले आहे. वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये स्वाभिमानी आणि बळिराजा या दोन्ही शेतकरी संघटनांचे अजूनही बऱ्यापैकी प्राबल्य टिकून आहे. येत्या निवडणुकीत त्यांचाही प्रभाव दिसून येणार आहे.

वाखरी जिल्हा परिषद गटातील पिराची कुरोली, वाडीकुरोली, पटवर्धन कुरोली, आवे, देवडे, तरटगाव, शेळवे, खेडभाळवणी, शिरढोण, कौठाळी, भंडीशेगाव, वाखरी या भीमा नदीकाठी असलेल्या गावांमध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. येथील शेतकऱ्यांचा विठ्ठल, पांडुरंग, सहकार शिरोमणी, युटोपियन, सीताराम या कारखान्यांशी संबंध येतो. या वर्षी ऊस टंचाई असतानाही पांडुरंग आणि युटोपियनच्या तुलनेत विठ्ठल परिवाराशी निगडित असलेले विठ्ठल व सहकार शिरोमणी या दोन्ही कारखाने दरात मागे राहिल्याने येत्या निवडणुकीत ऊसदराचा मुद्दा चांगलाच गाजणार आहे.

वाखरी गटातील इच्छुक
वाखरी जिल्हा परिषदेसाठी या वेळी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे. मागील निवडणुकीतील पराभव धुऊन काढण्यासाठी परिचारक गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बाजार समितीचे माजी सभापती दाजी पाटील व नाना गोसावी यांची नावे चर्चेत आहेत. तर भालके-काळे गटाकडून तात्या मदने, दत्ता चौगुले व बळिराजा शेतकरी संघटनेचे संजय राऊत हे इच्छुक आहेत.

वाखरी पंचायत समिती गण इच्छुक
सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या वाखरी पंचायत समिती गणासाठी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परिचारक गटाकडून वैभव धुमाळ, स्वाभिमानीचे नवनाथ माने, पांडुरंग कारखान्याचे संचालक गुलाब पोरे यांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर काळे-भालके गटाकडून मोहन नागटिळक, बिभीषण पवार, शहाजी साळुंखे यांनी उमेदवारीसाठी नेत्यांकडे आग्रह धरला आहे.

पिराची कुरोली गण इच्छुक
पिराची कुरोली पंचायत समिती गणामध्ये भालके-काळे गटाकडून समाधान काळे, पांडुरंग नाईकनवरे, नंदकुमार उपासे, मोहन अनपट तर परिचारक गटाकडून समाधान नाईकनवरे, रमेश गाजरे, शिवसेनेकडून राहुल पाटील, बळिराजाकडून माऊली जवळेकर आदी इच्छुक आहेत.

Web Title: sugarcane rate issue