Video : कोल्हापूर जिल्ह्यात 'येथे' पेटले ऊस दराचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूर येथे २३ तारखेला ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये ऊस दर निश्चित करण्यात येईल. ऊस दर जाहीर होत नाही तोपर्यंत कारखान्यास ऊस पाठवू नये असा इशारा संघटनेने दिला आहे.

दानोळी ( कोल्हापूर) : जिल्ह्यात काही ठिकाणी कारखान्याकडे निघालेले उसाचे ट्रॅक्टर अडविण्याच्या घटना घडल्या आहेत. आळते, दानोळी, उदगाव येथे ट्रॅक्टर अडवून त्यांच्या चाकातील हवा सोडण्यात आली. आळते येथे रात्री ट्राॅलीची चाकेही पेटवून देण्याची घटना घडली आहे. यामुळे जिल्ह्यात ऊस दरासाठीचे आंदोलन तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूर येथे २३ तारखेला ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये ऊस दर निश्चित करण्यात येईल. ऊस दर जाहीर होत नाही तोपर्यंत कारखान्यास ऊस पाठवू नये असा इशारा संघटनेने दिला आहे. 

हेही पाहा -  शेतकऱ्यांनो, संयम पाळा; राजू शेट्टींनी का केले असे आवाहन ? 

दानोळीत चार ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न

दानोळी ( ता. शिरोळ)  येथे अज्ञातांनी उसाने भरलेले चार  ट्रॅक्टर अडवून त्याची मोडतोड केली. त्यातील एक ट्रॅक्टर पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दानोळी जयसिंगपूर रस्त्यावर बुधवारी रात्री उशीरा अथवा पहाटे ह्या घटना घडल्या आहेत. सकाळी नागरीकांनी हि घटना लक्षात आली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. सर्व ट्रॅक्टर कर्नाटक येथील अथणी साखर कारखान्यास जात होते. ट्रॅक्टर वाठार व खोची येथील असल्याचे समजते. दानोळी जयसिंगपूर रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ दोन ट्रॅक्टरची व विघ्नहर्ता पाणी पुरवठाजवळ एका ट्रॅक्टरची सर्व चाकातील हवा सोडून हेडलाईट फोडण्यात आले आहेत. शांतिनगरजवळ एका ट्रॅक्टरची हवा सोडून मोडतोड करुन ऊस व ट्रॉली पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे.

आळते, उदगाव येथेही घटना

काल रात्र आळते येथेही अज्ञांताकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी कुंभोजकडून कर्नाटकातील कारखान्याकडे जाणाऱ्या चार ऊस वाहतूक वाहनांना उदगांव येथेही अडविण्यात आले होते. त्यावेळी कारखान्याचे शेती विभागाचे अधिकारी येवून ऊसाच्या दराचा प्रश्न मिटेपर्यंत आम्ही तोडी देत नसल्याचे लिहून दिले आहे. 

हेही पाहा - सरकारच्या स्थापनेच्या किमान समान कार्यक्रमावर राजू शेट्टी म्हणाले, 

दरम्यान, शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील कारखाने बंद आहेत. मात्र कर्नाटक व सीमा भागातील कारखाने सुरु झाले आहेत. त्यामुळे येथून ऊस पुरवठा करण्यात येत आहेत. दानोळी व कवठेसार येथे कोठेच तोडी सुरु नाहीत. मात्र कुंभोज, खोची, वाठार येथील ऊस असावा असा अंदाज करण्यात आला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane Rate Issue Agitation In Kolhapur District