विद्यागम योजनेचा दिला आदेश मात्र शिक्षकांची अनास्था

मिलिंद देसाई
Wednesday, 19 August 2020

तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शिकविण्यासाठी शिक्षण खात्याने विद्यागम ही योजना हाती घेतली

बेळगाव : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शिकविण्यासाठी शिक्षण खात्याने विद्यागम ही योजना हाती घेतली आहे. त्यानुसार शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यागम योजनेच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे द्यावेत अशी सुचना करण्यात आली आहे. मात्र गावागावात कोरोनाचे रुग्ण आढळुन येत असल्याने विद्यार्थ्यांना एकत्र करुन शिकविण्याबाबत शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक शिक्षक गावात जाऊन शिकविण्यास प्राधान्य देत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

शाळा कधी सुरु होणार याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणुन कार्य करावे तसेच योजनेनुसार प्रत्येक शाळेतील 20 ते 25 मुलांचा गट तयार करुन विद्यार्थ्यांना शिकविण्यात यावे अशी सुचना शिक्षण खात्यातर्फे करण्यात आली आहे. तसेच विद्यागम योजना लागु करण्यापुर्वी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांना गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे, विद्यागम योजनेचा विद्यार्थ्याना लाभ होईल असे मत व्यक्‍त होत आहे.

हेही वाचा- शेजाऱ्यांनी नाकारलं पण डॉक्टरांनी तारलं ; कठीण प्रसंगात लढाई जिंकायचीच !

मात्र अनेक गावात कोरोना रुग्ण आढळुन येत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर राखत शिकविण्यचा निर्णय घेतला तरी योजनेनुसार प्रत्येक शाळेतील 20 ते 25 मुलांचा गट करुन शिकविण्यास काही शिक्षक तयार नसल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी अद्याप शिक्षणापासुन वंचीत आहेत. तसेच अनेक भागातील बससेवा पुर्ववत झालेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन शिकविण्यास शिक्षकांना अडचण होत आहे. 

हेही वाचा- नियती कोणाला सोडत नाही ; निलेश राणेंकडून पुन्हा ठाकरे कुटुंबावर निशाना -

1 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शाळेत प्रवेश द्यावा. विद्यार्थी व पालकांना शाळेत बोलावून शैक्षणिक वर्षाबाबत मार्गदर्शन करावे. सामजिक अंतर ठेऊन विद्यार्थ्यांना बसण्याची सोय करावी अशा सूचना शिक्षण खात्याने केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन शिकविण्यासाठी विद्यागम योजना लाभदायक ठरणार असली तरी वाढत्या रुग्ण संख्येमुळे योजना लागु करताना अनेक अडथळे येत असल्याचे दिसुन येत आहे. 

हेही वाचा- ब्रेकिंग- कोल्हापूर जिल्हापरिषदेत गोंधळ

सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तरीही शाळा बंद असल्याने शिक्षक विद्यागम योजनेतंर्गत गावात जाऊन शिकवित असुन शिक्षकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. शिक्षक गावात जाऊन शिकवित असल्याने विद्यार्थ्यांची सोय होत आहे. 
जयकुमार हेबळी, अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघटना

संपादन ‌- अर्चना  बनगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suggestion to impart education lessons to students in rural areas through Vidyagam Yojana