
सांगली : सासरच्या छळास कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
कोकरूड: माणिकवाडी ता. वाळवा येथील नवविवाहिता हर्षदा सागर आटकेकर (वय २२) हिने सासरच्या छळास कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असून वडील नामदेव रामचंद्र शिंदे (रा. मांगरूळ) यांनी कोकरूड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मांगरूळ (ता. शिराळा) येथील नामदेव रामचंद्र शिंदे यांच्या हर्षदा या मुलीचा विवाह २१ फेब्रुवारी २०२२ रोजी माणिकवाडी (ता. वाळवा) येथील सागर जगन्नाथ आटकेकर याच्याशी झाला होता.
सागर हा सैन्यदलात नोकरीस असून तो सध्या जम्मू-काश्मीर येथे आहे. पती सागर जगन्नाथ आटकेकर, सासू कमल जगन्नाथ आटकेकर, दीर जयदीप जगन्नाथ आटकेकर (रा. माणिकवाडी) व नणंद सोनाली (रा. केदारवाडी ) यांनी हर्षदा हिचा मानसिक, शारीरिक छळ सुरू केला होता, तर पती सागर तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सागर आटकेकरचे एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे हर्षदास समजले होते. त्यामुळे पती व घरचे लोक हर्षदास सातत्याने त्रास देत होते. मुलीला होत असलेल्या रोजच्या त्रासामुळे आई-वडील मृत हर्षदास २९ एप्रिल रोजी माहेरी (मांगरुळ) घेऊन आले होते.
माहेरी आल्यापासून ती उदासीन होती. मनावरील सातत्याच्या दडपणाने तिने वाईट वाटून घेऊन २ मे रोजी विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी तिला कोकरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिच्या वडिलांनी पती सागर जगन्नाथ आटकेकर, सासू कमल जगन्नाथ आटकेकर, जयदीप जगन्नाथ आटकेकर (रा. माणिकवाडी) ता. वाळवा व नणंद सोनाली (रा. केदारवाडी) या चौघांच्या विरोधात कोकरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सपोनि ज्ञानदेव वाघ करीत आहेत.
अंत्यसंस्काराला सासरचे अनुपस्थित
हर्षदाने विष घेऊन आत्महत्या केलेच समजून देखील कठोर हृदयी सासरचे कोणीही अंत्यसंस्कारालाही आले नाहीत.
Web Title: Suicide After News Harassed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..