VIDEO: लॉकडाउनमध्ये या नेत्याने चालवलंय कुत्र्यांसाठी अन्नछत्र! 

दीपक रोकडे
Friday, 17 April 2020

कोरोनापासून वाचण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे गावागावांतील चौकाचौकांत असलेले खाद्यपदार्थांचे हातगाडे, हॉटेले, बेकऱ्या, मांसविक्री केंद्रे बंद झाली. घरोघरी काटकसरीने खाणे-पिणे सुरू झाले. परिणामी, खरकटे आणि उरलेले अन्न कुत्र्यांना टाकणे जवळपास बंद झाले.

नगर ः कोरोनाने संपूर्ण जग हादरले. अशा परिस्थितीत पैसा, सत्ता, कीर्ती यांपेक्षा जीवन महत्त्वाचे आहे, हे माणसाला कळले. आपल्या गरजा काहीच नाहीत आणि घाईचे व तातडीचे कामच नाही, हेदेखील मानवाला कळले.

अशा स्थितीत "भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे' हे संत ज्ञानेश्‍वरांनी मागितलेले पसायदान सर्व प्राणिमात्रांसाठी किती महत्त्वपूर्ण आहे, याची प्रचिती आली आणि लॉकडाउनच्या काळात सैरभैर झालेल्या कुत्र्यांची भूक जाणली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी... गोरगरीब माणसांसाठी सध्या सर्वत्र मदतीचा ओघ सुरू असताना गावोगावच्या कुत्र्यांसाठी त्यांनी सुरू केलेले अनोखे अन्नछत्र सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे! 

कोरोनापासून वाचण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे गावागावांतील चौकाचौकांत असलेले खाद्यपदार्थांचे हातगाडे, हॉटेले, बेकऱ्या, मांसविक्री केंद्रे बंद झाली. घरोघरी काटकसरीने खाणे-पिणे सुरू झाले. परिणामी, खरकटे आणि उरलेले अन्न कुत्र्यांना टाकणे जवळपास बंद झाले. त्यामुळे सध्या चौकाचौकांत निस्तेज झालेली भटकी कुत्री केविलवाण्या अवस्थेत बसलेली दिसत आहेत.

एखादे दुचाकी किंवा चारचाकी वाहन दिसले, की आशाळभूत नजरेने त्यांच्याकडे पाहत ही कुत्री काही पावले धावण्याचा प्रयत्न करतात. रात्रीच्या वेळी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी दुचाकींवरून घरी जाताना त्यांच्या मागे धावणारी काही कुत्री दिसतात. मात्र, नेहमी ज्या त्वेषाने ती धावतात, तो दिसत नाही. आम्हाला कुणी तरी खायला देईल, ही आशाच त्या धावण्यामागे जास्त दिसते. या कुत्र्यांची हीच अगतिकता हेरली सुजित झावरे यांनी... 

हेही वाचा - या शेतकऱ्याने गुलललाच लावले कामाला

देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून झावरे गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्‍यातील गरजूंना किराणा आणि जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करीत आहेत. अशाच कामानिमित्त ढवळपुरीहून प्रवास करीत असताना त्यांनी काही भटकी कुत्री रस्त्याच्या कडेला केविलवाण्या अवस्थेत बसलेली पाहिली. का कोण जाणे, त्यांनी मोटार थांबविली आणि खिन्न होऊन या कुत्र्यांकडे पाहत बसले.

गावोगावी गरीब कुटुंबांना किराणा साहित्य देण्याबरोबरच गावोगावच्या भटक्‍या कुत्र्यांना, अन्य पशुपक्ष्यांना काही तरी मदत करावी, असा विचार त्यांच्या मनात आला. लगेच त्यांनी भाळवणी गाठली. तेथे अभिजित रोहोकले यांच्या हॉटेलवर गेले. विचारविनिमय केला आणि गावोगावच्या राखणदार कुत्र्यांसाठी रोज भाकरी देण्याचे ठरविले. रोहोकले यांच्या हॉटेलच्या भट्टीवर रोज हजार भाकरी करायचे ठरले आणि या कामाला सुरवातही केली. 

तयार झालेल्या भाकरी आपल्या मोटारीत घेऊन स्वतः झावरे रस्त्याने दिसणाऱ्या प्रत्येक कुत्र्यासमोर त्या टाकत फिरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून माणसाचे दर्शनच दुर्लभ झाल्याने सुरवातीला कुत्री त्यांच्या जवळ येईनात. भाकरी टाकली, तरी अविश्‍वासाने दूर जाऊ लागली. मात्र, आता कुत्र्यांचाही विश्‍वास बसू लागलाय. आता कुत्री त्यांच्या जवळ येत आहेत. त्यांनी प्रेमाने दिलेली भाकरी खात खात कृतज्ञतेने त्यांच्याकडे पाहत आहेत... आता वेगवेगळ्या गावांत रोज न चुकता कुत्र्यांना किमान एक हजार भाकरी टाकण्याचा विडाच सुजित झावरे यांनी उचलला आहे... 

"सकाळ'शी बोलताना झावरे म्हणाले, ""भारतीय संस्कृतीत भूतदयेला अत्यंत महत्त्व आहे. या सर्वांचे मानवजातीवर असंख्य उपकार आहेत. त्यांचे आपण देणे लागतो. संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितलंय, 
शांती करा तुम्ही ममता नसावी। 
अंतरी वसावी भूतदया।। 
भूतदया ठेवा मग काय उणे। 
प्रथम साधन हेचि असे।। 

कुत्रा हा सर्वाधिक माणसाळलेला प्राणी आहे. जीवसृष्टीच्या साखळीतील महत्त्वाचा घटक. अशा संकटकाळात आपण त्याची काळजी घेतली, तर पुढे तो आपली काळजी घेणार आहे... '' 
झावरे यांनी "प्रकाशवाटा' या चित्रपटातील एका गाण्याच्या दोन ओळीही ऐकवल्या... 
हरवले आभाळा ज्यांचे हो तयांचा सोबती 
सापडेना पार ज्यांना हो तयांचा सारथी! 

भूतदया गरजेची
नैसर्गिक समतोल राखण्याच्या दृष्टीने आणि भूतदया म्हणून सगळ्यांनी आपापल्या गावात कुत्र्यांना भाकरी किंवा इतर अन्न देण्याचा प्रयत्न करून संवेदना जिवंत असल्याचे दाखवून द्यावे. भटक्‍या; परंतु गावाच्या राखणदारांची परवड होत आहे. ते ती कोणाकडे व्यक्तही करू शकत नाहीत. त्यांची काळजी माणसांनी नाही तर कुणी घ्यायची? 
- सुजित झावरे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sujit Jaware gives dogs food