वाढता उकाडा... अन्‌ पाण्यात उड्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पाण्याचे डोह तुडुंब...
पाणी पाहून पोहण्याचा मोह जरी आवरत नसला तरीही मुलांनी मोठ्यांच्या समवेतच पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेण्याची आवश्‍यकता आहे. अशा स्थितीत सध्या मात्र पाण्याचे डोह दुपारच्या सत्रात हाउसफुल्ल होत आहेत.

भुईंज - दिवसेंदिवस तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे मुश्‍कील होत आहे. त्यातच सध्या सर्वत्र सकाळच्या सत्रात शाळा सुरू असून, दुपारच्या सत्रात अनेक शाळकरी मुले थंडावा मिळविण्यासाठी नदीपात्रामध्ये पोहायला जाताना दिसत आहेत. पोहायला शिकण्याबरोबर थंडाव्याचा आनंद घेण्याचा उद्देश असला तरी, एखादा अपघात होण्याची शक्‍यताही निर्माण होत आहे. त्यामुळे दक्षता घेण्याची गरज आहे.

या वर्षीचा उन्हाळा नागरिकांना असह्य झाला आहे. पाचगणी-महाबळेश्वरच्या पायथ्याला असलेल्या वाई तालुक्‍यात उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी बालचमूंनी आपला मोर्चा अंघोळीसाठी नदी, विहीर अथवा जवळ असेल तर कालव्याकडे वळविला आहे. त्यामुळे सध्या विहिरी व नदीवर बालकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यातून एखादा अपघात होण्याचीही शक्‍यता बळावत असल्याने पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

वाई तालुका नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. सर्वत्र हिरवळ असूनही सध्या तापमानात प्रचंड वाढ होत आहे. यामुळे प्रचंड उष्मा जाणवत आहे. सकाळच्या सत्रात शाळा, कॉलेज सुरू असल्याने दुपारच्या वेळी ही मुळे अंघोळीसाठी कृष्णा नदी, धोम धरणाचा उजवा-डावा कालवा, शिवारातील विहिरीवर मोठी गर्दी करीत आहेत. वाई तालुक्‍यात धोम व धोम-बलकवडी असे दोन प्रकल्प असल्यामुळे नदीला बारमाही पाणी असते. नद्यांना बांध घालून पाणी अडविलेल्या ठिकाणी शांत व स्वच्छ पाणी पोहण्यासाठी भुरळ घालत आहे. त्यामुळे पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

Web Title: Summer Heat Temperature Swimming