उन्हाचा चटका; आरोग्याला फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

काळजी घेण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन; दुष्काळी तालुक्‍यांसह बागायती पट्ट्यातही झळा

गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच चढल आहे. कधी नव्हे ते साताऱ्यातील तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोचू लागले आहे. माण, खटाव व फलटणमध्येही उन्हाचा चटका बसत आहे. या वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या तक्रारीही वाढत आहे. त्यासाठी काळजी घेणे हा सर्वोत्तम उपचार आहे. 

काळजी घेण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन; दुष्काळी तालुक्‍यांसह बागायती पट्ट्यातही झळा

गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच चढल आहे. कधी नव्हे ते साताऱ्यातील तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोचू लागले आहे. माण, खटाव व फलटणमध्येही उन्हाचा चटका बसत आहे. या वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या तक्रारीही वाढत आहे. त्यासाठी काळजी घेणे हा सर्वोत्तम उपचार आहे. 

पाण्याचा वाढवा वापर 
उष्णतेमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करताना घामाचे उत्सर्जन होते. त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ठराविक काळाने पाणी पिणे अत्यावश्‍यक आहे. त्यातही अतिथंड पाणी पिणे टाळावे. बाहेरून आल्यावर शरीराच्या तापमान वाढलेल असते. त्यामुळे शरीराचे तापमान योग्य अवस्थेत आल्यावर पाणी प्यावे.

फळांचा रस हितकारक
उकाड्यापासून हैराण होत असल्याने थंडपेय पिण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र, रासायनिक प्रक्रियेने बनविलेल्या पेयांचा वापर टाळावा. फळांचा व उसाचा रस आरोग्यास अधिक हितकारक असतो. कलिंगड, काकडी, मोसंबी, संत्री, टरबूज अशी पाणीदार फळे खावीत. लिंबू पाणी किंवा सरबत पिल्याने शरीराला साखरेचा व पाण्याचा संयुक्तिक पुरवठा होतो. त्यामुळे ते प्यावे. मात्र, तो शुद्ध पाण्यात बनवलेला असावा. 

उष्ण पदार्थांचे नको सेवन 
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने आहार वेळेवर तसेच योग्य पद्धतीचा घेणे गरजेचे आहे. अती तेलकट किंवा अती तिखट पदार्थांनी उष्णतेत वाढ होते. त्यामुळे बाहेर खाणे टाळावे. उन्हाळ्यात अनेकांना पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे उन्हातून चालणे तसेच आंबट, तेलकट फास्ट फूड टाळावे. चहा, कॉफीने उष्णता वाढते. त्याचा अतिरेक टाळावा.

उन्हाळ्यात होणारे प्रमुख आजार
लघवीचे प्रमाण कमी होणे, होताना जळजळ होणे 
मूत्रामध्ये जंतूसंसर्ग होऊन थंडी- ताप येणे 
मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात खडे निर्माण होणे 
उलट्या- जुलाबाचा त्रास 
अशुद्ध व अप्रमाणातील बर्फामुळे टायफॉईड, कावीळचा धोका 
शरीरातील पाणी व क्षार कमी होऊन उष्माघात होणे 
डोळे लाल होणे, जळजळणे, डोळे येणे 
घामोळ्या व गजकर्णासारखे त्वचाविकार  

हे करा उपाय... 
दर तासाला किमान एक ते दीड ग्लास पाणी प्या 
ताक, लस्सी, शहाळे घ्या 
माठातले थंड पाणी प्या 
लिंबू सरबतात मीठ- साखरेबरोबर थोडा खाण्याचा सोडाही घाला
कलिंगड, संत्री, काकड्या, द्राक्षे अशी फळे खा
पुरुषांनी टोपी, हॅट किंवा स्त्रियांनी डोक्‍यावर स्कार्फ व गॉगल वापरावा 
कपडे सैल, सुती व फिकट रंगाचे असावेत
थंड पाण्याने अंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवावे
 

उन्हाळ्यात हे टाळा... 
बर्फाळलेली कोलायुक्त किंवा तत्सम शीतपेये, कृत्रिम सरबते, पॅकबंद रस 
फ्रीजमधील दातांना कळा आणणारे पाणी 
उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नका 
गडद रंगाचे, सिंथेटिक कापडाचे आणि घट्ट कपडे नको

चक्कर येणे, अती घाम येणे, ताप येणे, लघवी कमी होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास प्रथम सर्व अंग थंड पाण्याने पाच मिनिटे पुसावे. जलसंजीवनी (मीठ, साखर व पाणी) द्यावी व रुग्णाला त्वरित दवाखान्यात घेऊन जावे. उन्हाळ्यात विविध आजार उद्‌भवत असल्याने अंगावर न काढता लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

- डॉ. महेश खताळ, सातारा

फलटण शहर @ ४२.४
फलटण शहर - यावर्षी एप्रिलच्या मध्यान्हातच तापमानाने उसळी घेतली आहे. तालुक्‍यातील सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद फलटण शहरात झाली आहे. मागील वर्षी एप्रिलमध्येही एवढे तापमान नोंदवले गेले नव्हते. बुधवारी (ता. १९) दहिवडीत ४१, तर लोणंदमध्ये ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. बागायती पट्टा व धोम बलकवडीच्या पाण्यामुळे तापमानावर काही प्रमाणात परिणाम जाणवत असून, शहरातील तापमान ३९ अंश नोंदविण्यात आले. सध्याच्या वातावरणात कमालीची तफावत जाणवत आहे. रात्रीच्या वेळी दव पडत असून, सकाळच्या सुमारास थंड हवा सुटत आहे. दुपारच्या सत्रात हेच तापमान ४० अंशापर्यंत जात आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या गॅस्ट्रोची साथ आहे. लहान मुलांना उकाळून थंड केलेले पाणी भरपूर प्रमाणात पिण्यास द्यावे. ताप जाणवल्यास ओल्या कापडाने अंग पुसून घ्यावे. ११ ते ५ या वेळेत लहान मुलांना घराबाहेर सोडू नये, असे आवाहन बालरोग तज्ज्ञ डॉ. अंजली फडे यांनी केले आहे.
 

ओकीत सुटे आग नभी  हा सूर्य ‘सकाळीच’..!

दुपार व्हायच्या आतच आग ओकणाऱ्या सूर्याच्या झळांनी नागरिक बेजार झालेत. सावली, गारव्याच्या धांडोळ्यात नित्य कामे केली जात आहेत. या झळांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या कामाच्या वेळाच बदलून टाकल्यात. सकाळी नऊपासूनच उन्हातील तप्तता वाढतेय. अकरापर्यंत उन्हाची तीव्रता आणखी वाढते. कोणत्याही कार्यालयात, घरात दिवसभर पंख्यांची घरघर आणि भिरभिर सुरू ठेवावी लागत आहे. कार्यालयाबाहेरील हिरवळ आणि झाडांच्या सावलीत अनेक नागरिक बसलेले आढळतात. कोणी नागरिक डोक्‍यावर टोपी घालून, तर छत्री घेऊनच ज्येष्ठ बाहेर पडलेले आढळतात. महिला गॉगल, दुपट्टा तोंडावर घेतल्याशिवाय कोठे जातच नाहीत.

सायंकाळी पाच वाजले, तरी वाहनातून जाताना गरम वाऱ्याशी सामना करावा लागत आहे. नागरिक थंडाव्यासाठी उसाचा रस, लिंबाचे सरबत अशा थंड पेयांचा आसरा घेत असले, तरी तेवढ्यापुरताच गारवा वाटतो, पुन्हा उन्हाच्या झळा आहेतच. 

सायंकाळी सहा वाजले तरी हवेत गारवा येत नाही. रात्री दहा- अकरापर्यंत उष्मा जाणवत असल्याने नागरिक बोजार होऊन गेलेत. या कडक उन्हाने शेतकऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलून टाकल्यात. सध्या शेतीच्या पेरणीपूर्व मशागती सुरू आहेत. बागायती पिकांत खुरपणी, काढणी, सड वेचणे अशी कामे सुरू आहेत. सकाळी अकराच्या आत आणि दुपारी चारनंतरच शेतकरी शेतात कामे करताना आढळत आहेत. 

कष्टकऱ्यांना मात्र या उन्हाची तमा बाळगून चालत नाही. तापलेल्या उन्हात वीटभट्टीच्या कामावर डोक्‍याला टॉवेल गुंडाळून, लांब बाह्यांचा शर्ट घालून महिला, मुले काम करताना दिसत आहेत. तापलेल्या वीटभट्टीच्या सावलीतच त्यांचा विसावा होतो.

Web Title: summer hit, health loss