रविवारची सुटी बॅंकांच्या दारात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - चलनातून बंद झालेल्या हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी आणि नोटा बदलून घेण्यासाठी रविवारी दिवसभरही रांगेत 
उभे राहण्याची वेळ अनेकांवर आली. सुटीचा दिवस असूनही बॅंका गर्दीने गजबजलेल्या होत्या. प्रत्येक बॅंकेच्या दारात गर्दी दिसून येत होती. स्टेट बॅंक वगळता अन्य बहुतांशी बॅंकांची एटीएम सेवा आजही बंदच राहिली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आजही काळजी दिसून येत होती.  

कोल्हापूर - चलनातून बंद झालेल्या हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी आणि नोटा बदलून घेण्यासाठी रविवारी दिवसभरही रांगेत 
उभे राहण्याची वेळ अनेकांवर आली. सुटीचा दिवस असूनही बॅंका गर्दीने गजबजलेल्या होत्या. प्रत्येक बॅंकेच्या दारात गर्दी दिसून येत होती. स्टेट बॅंक वगळता अन्य बहुतांशी बॅंकांची एटीएम सेवा आजही बंदच राहिली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आजही काळजी दिसून येत होती.  

रविवार सुटीचा दिवस; पण आज या सुटीचा आनंद अनेकांना घेता आला नाही. सकाळी दहापासून अनेकांना रांगेतच उभे राहावे लागले. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बॅंकेत भरायच्या आणि त्या बदल्यात शंभर अथवा दोन हजार रुपयांची नोट बदलून घ्यायची यासाठी प्रत्येक बॅंकेत रांगा लागल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेऊन पाच ते सहा दिवस झाले; पण अजूनही जनजीवन सुरळीत झालेले नाही. अनेकांचे खिसे अद्यापही रिकामेच आहेत. सकाळी दहापासून बॅंकेत लांबच लांब रांगा लागत आहेत. बॅंकेत जाणे, आधार कार्डच्या झेरॉक्‍सला स्लीप जोडणे, फॉर्म भरणे आणि ते बॅंकेच्या काउंटरवर देणे यासाठी सुटीचा निम्मा दिवस घालविण्याची वेळ अनेकांवर आली. बॅंकेतून पैसे बदलून घेतल्याशिवाय अनेकांकडे बाजारालाही पैसे नव्हते. त्यामुळे सकाळपासूनच बॅंकांमध्ये मोठी गर्दी दिसून येत होती. एसबीआय बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, र्बॅक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बॅंक, आयसीआयसीआय बॅंक यांसह सर्वच बॅंकांच्या दारात भल्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या. चार ते पाच तासांनी अनेकांचे नंबर आले. त्यानंतर त्यांना नोटा बदलून मिळाल्या. शंभर आणि दोन हजार रुपयांच्याच नोटा होत्या. अनेक ठिकाणी नागरिक बहुतांशी शंभरच्याच नोटा मागत होते. 

मंडप आणि पाण्याचे स्टॉलही
बहुतांशी बॅंकांनी आपल्या दारात मंडप घातले होते. नागरिकांना उन्हात रांगेत उभारल्यानंतर त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात आली होती. काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या विभागातील बॅंकांच्या दारात पाण्याचे स्टॉल उभारले होते. तेथे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी याबाबत आवाहन केले होते. बॅंकेच्या ठिकाणी काँग्रेस नगरसेवकांनी पाणी वाटप केले. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, किशोर खानविलकर, विजयसिंह माने, ए. डी. गजगेश्‍वर, अन्वर शेख, दुर्वास कदम, लाला भोसले आदींनी यामध्ये भाग घेतला.

त्‍यांचे खिसे रिकामेच
एसबीआय, आयसीआयसीआय आणि काही प्रमाणात आयडीबीआय बॅंकेची एटीएम वगळता बहुतांशी बॅंकांची एटीएम सेवा बंदच आहे. त्यामुळे बऱ्याच नागरिकांचे खिसे अजूनही रिकामेच आहेत. बॅंकेच्या लांबच लांब रांगेत उभा राहायची ज्यांची तयारी नाही, अशा नागरिकांना मात्र रिकामे खिसे घेऊनच गप्प बसावे लागत आहेत.

मनपात कर भरण्यासाठी तिसऱ्या दिवशीही गर्दी
कोल्हापूर - महापालिकेचा कर भरण्यासाठी पाचशे आणि हजारांच्या नोटा चालत असल्याने तो भरण्यासाठी सलग तिसऱ्या दिवशीही गर्दी कायम होती. रविवारी सुटी असूनही महापालिकेच्या तिजोरीत नागरिकांनी ६७ लाखांचा भरणा केला. तीन दिवसांत मनपाकडे ४ कोटी ९ लाख १७ हजार ३४ रुपये असा महसूल जमा झाला आहे. केंद्राने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर सरकारी कर भरण्यासाठी मात्र या नोटा चालतील, असे आवाहन करण्यात आले. त्यामुळे महापालिकेची थकबाकी भरण्यासाठी गर्दी झाली. वर्षानुवर्षे ज्यांनी करच भरला नाही, असे काही लोकही यामुळे पुढे आले. महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात कर भरण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Sunday at the door of their banks