कोल्हापुरात आज 'या' पेठेत मटण दुकाने राहणार बंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

अशोकराव साळोखे म्हणाले, "1970 साली मटणाचा दर 20 रुपये किलो होता. त्यावेळी 10 रुपये वाढ झाल्याने आंदोलन झाले. मनमानी पद्धतीने दर वाढवणे बंद झाले पाहिजे. दरवाढीवर सर्वांनीच बहिष्कार घालावा. आंदोलन करावे.'

कोल्हापूर - मटण दरवाढीच्या विरोधात शिवाजी पेठेतील सर्व मटण दुकाने रविवारी (ता. 8) बंद ठेवण्याचा निर्णय शिवाजी पेठेतील तालीम, संस्था आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज झाला. खाटीक समाजाचे प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची शिवाजी मंदिरात बैठक झाली. यात खडाजंगी चर्चा झाली. मात्र, दरवाढीवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे दुकाने बंद ठेवण्याचे ठरले. 

यावेळी ऍड. अशोकराव साळोखे म्हणाले, "1970 साली मटणाचा दर 20 रुपये किलो होता. त्यावेळी 10 रुपये वाढ झाल्याने आंदोलन झाले. मनमानी पद्धतीने दर वाढवणे बंद झाले पाहिजे. दरवाढीवर सर्वांनीच बहिष्कार घालावा. आंदोलन करावे.'

450 रुपये प्रतिकिलो दरच हवा

चंद्रकांत यादव म्हणाले, "मटण दरवाढीवर कोणाचेही नियंत्रण नाही. सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. महापालिकेचा शिक्का असलेले बकरेच कापले गेले पाहिजे.' 450 रुपये प्रतिकिलो दराने मटण विकणार असाल, तरच ही दुकाने सुरू राहतील, असा इशारा सुजित चव्हाण यांनी दिला आहे. नगरसेवक अजित राऊत म्हणाले, "मटण दुकाने महापालिकेने बंद करावीत. गाळ्याचे भाडे अनेक वर्षे थकीत आहे. ते वसूल करावे.'

हेही वाचा - झटपट निकाल ! विनयभंग प्रकरणी अवघ्या पाच दिवसांत शिक्षा 

मटण दुकानांचे गाळे सील करावेत

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, "महापालिकेने मटण दुकानांचे गाळे सील करावेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करावी.' यावेळी दत्ता टिपुगडे, संभाजी साळोखे, सुरेश जरग यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीला सदाभाऊ शिर्के, अजित खराडे, लाला गायकवाड, श्रीकांत भोसले, विजय माने, राजेंद्र चव्हाण, सुरेश गायकवाड, विशाल बोंगाळे, राजू निकम, शाहीर दिलीप सावंत, शिवाजी जाधव, सुहास साळोखे आदी उपस्थित होते. 

तालीम, संस्थांची आक्रमक भूमिका 

शहरातील मटण दरवाढीचा मुद्दा चिघळला असून, आता तालीम, संस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मटण विक्रेत्यांनी 540 रुपये किलो हा दर ठरवला आहे. त्याला तालीम, संस्थांनी विरोध केला आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On Sunday Mutton Shop Band In Kolhapur Shivaji Peth