‘राजारामपुरी’ला जमते; तुम्हाला का नाही?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

कोल्हापूर - मटका, जुगार, घरफोड्यांसह विविध गुन्हेगारांवर तडीपारीचे प्रस्ताव फक्त राजारामपुरी पोलिस ठाण्याकडून सादर होतात. मात्र, इतर पोलिस ठाण्यांचे कोणी हात बांधलेत का? अशा शब्दांत आज पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जिल्ह्यातील प्रलंबित सहा खुनांच्या गुन्ह्यांचा छडा लावा, अवैध धंदे हद्दपार करा, असे आदेशही त्यांनी या वेळी दिले. 

कोल्हापूर - मटका, जुगार, घरफोड्यांसह विविध गुन्हेगारांवर तडीपारीचे प्रस्ताव फक्त राजारामपुरी पोलिस ठाण्याकडून सादर होतात. मात्र, इतर पोलिस ठाण्यांचे कोणी हात बांधलेत का? अशा शब्दांत आज पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जिल्ह्यातील प्रलंबित सहा खुनांच्या गुन्ह्यांचा छडा लावा, अवैध धंदे हद्दपार करा, असे आदेशही त्यांनी या वेळी दिले. 

पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तब्बल साडेचार-पाच तास ही बैठक चालली. यापूर्वी झालेल्या चार ते पाच बैठकांत पोलिस अधीक्षक तांबडे यांनी मटका, जुगार असे अवैध धंदे चालविणाऱ्या गुन्हेगारांसह खून, मारामाऱ्या, चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे प्रस्ताव पाठवा, अशा सूचना सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या होत्या. मात्र, आतापर्यंत फक्त राजारामपुरी पोलिस ठाण्यानेच हद्दपारीचे प्रस्ताव दाखल केले. इतर पोलिस ठाण्यांकडून अद्याप एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही. याची दखल घेत तांबडे यांनी गुन्हेगार फक्त राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातच आहेत का? इतर ठिकाणी सर्व अलबेल आहे का? फक्त राजारामपुरी पोलिस ठाणेच तडीपारीचे प्रस्ताव पाठवते, इतरांना त्याचे गांभीर्य का नाही? की त्यांना असे प्रस्ताव पाठविण्यात काही अडचण आहे का? कोणी त्यांचे हात बांधले आहेत का? अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. सर्व पोलिस ठाण्यांकडून तातडीने गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले पाहिजेत, असेही आदेश त्यांनी दिले. 

रुकडीतील डॉक्‍टर दाम्पत्य, गोकुळ शिरगाव येथील अज्ञाताचा खून, असे जिल्ह्यातील सहा खुनांचे गुन्हे तातडीने उघड करा. त्यासाठी वरिष्ठांची आणि सायबर सेलची मदत घ्या. जिल्ह्यात सुरू असणारे जुगाराचे अड्डे शोधून काढा. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडून १४ ते २३ मार्च अखेर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रलंबित तपासाची कामे पूर्ण करा. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करा. याबाबत प्राप्त झालेल्या आदेशानुसार कोण काम करत नसेल तर त्याचा अहवाल थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला जाईल, असेही अधीक्षक तांबडे यांनी सांगितले. या वेळी अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, डॉ. दिनेश बारी, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, करवीरचे हर्ष पोद्दार, शाहूवाडीचे सूरज गुरव आदी उपस्थित होते. 

राणे, देशमुख यांचे कौतुक 
डॉ. कृष्णा किरवले खून प्रकरणातील संशयित मारेकऱ्यांना तातडीने अटक केल्याबद्दल शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांचे पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांनी बैठकीत कौतुक केले.

Web Title: superintendent of police mahadev tambde