esakal | भिऊ नका : पोलिस दल महिलांच्या पाठीशी
sakal

बोलून बातमी शोधा

भिऊ नका : पोलिस दल महिलांच्या पाठीशी

पोलिस अधीक्षक पाच मार्चला फलटण येथे, सहा मार्चला सातारा येथे दहा मार्चला पाटण येथे, अकरा मार्चला कऱ्हाड येथे, चौदा मार्चला सातारा ग्रामीण येथील कार्यालयात महिलांशी संवाद साधणार आहेत. 

भिऊ नका : पोलिस दल महिलांच्या पाठीशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांच्या तपासाचा आढावा व महिलांच्या अडचणी आजपासून (ता. चार) जाणून घेणार आहेत. चार ते 14 मार्च दरम्यान होणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून अधिक्षकांनी जिल्ह्यातील महिलांना अनोखी भेट दिली आहे.
 
आठ मार्च हा संपूर्ण जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त विविध ठिकाणी, विविध विभागांच्या माध्यमातून महिला दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यातील बहुतांश कार्यक्रम हे प्रबोधनपर असतात किंवा त्या दिनापुरतेच मर्यादित असतात. त्यातून महिलांना ठोस असे काही मिळत नाही. मात्र, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या वेळचा महिला दिन आगळ्या- वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार केला आहे. संपूर्ण पोलिस दल महिलांच्या पाठीशी खंबीर उभे आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न त्यातून करणार आहेत. 
महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाभरातून सुमारे 60 कार्यक्रमांबाबत अधीक्षकांना विचारणा झाली होती; परंतु त्यातून प्रत्यक्ष पीडित किंवा अडचणीत असलेल्या महिलांना किती न्याय मिळेल असा विचार त्यांच्या मनात आला. अनेक वेळा महिलांबाबतचे गुन्हे गांभीर्याने घेतले जात नाहीत, तपास योग्य पद्धतीने होत नसल्याने संशयितांना शिक्षा होत नाही. न्यायालयात पैरवी अधिकाऱ्यांकडे योग्य समन्वय राखला जात नाही. काही ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांना योग्य वागणूक मिळत नाही, अशी परिस्थती असते. त्यातूनच त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागांमध्ये एक दिवस जाऊन पीडित महिलांशी संवाद साधण्याचा त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील सात उपविभागांमध्ये एक दिवस महिलांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
या उपक्रमाअंतर्गत अधीक्षक सातपुते या आजपासून (ता.चार) 14 मार्च पर्यंत विविध उपविभागांमध्ये जाणार आहेत. तेथे महिलांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या तपासाचा आढावा घेतला जाणार आहे. तपास योग्य पद्धतीने होतो आहे का, दोषारोपपत्र पाठविली गेली आहेत का, त्यामध्ये काही त्रुटी आहेत का, याची पाहणी करून त्रुटी कशा सुधारता येतील याबाबत त्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याबरोबर महिलांना काही त्रास असल्यास, पोलिस अधिकाऱ्यांकडे योग्य मदत मिळते का याबाबत महिलांशी त्या संवाद साधणार आहेत.

हेही वाचा : बाप जन्मात मी कुणाला मुजरा घातला नाही; फलटणच्या राजेंनी भाजपात जावे
 
महिलांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्या- त्या विभागातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी अधीक्षक सातपुते संवाद साधणार आहेत. महिला कक्ष, स्वच्छता गृह, लहान मुलांचा प्रश्‍न अशा त्यांच्या काही समस्या असल्यास त्या जाणून घेऊन सोडविण्याचा तातडीने प्रयत्न केला जाणार आहे. याच ठिकाणी त्या-त्या परिसरात विविध विभागांमध्ये चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार करण्याच्या कार्यक्रमाचेही नियोजन केले जाणार आहे. त्या-त्या डिव्हिजनमधील मुख्य पोलिस ठाण्यात हा उपक्रम होणार आहे.महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर चार ते 14 मार्च या कालावधीत महिलांबाबतच्या गुन्ह्यांचा तपासाची प्रगती व महिलांच्या अडचणी जाणून घेणार आहे. त्या-त्या उपविभागांतील महिलांनी ठरलेल्या दिवशी आपल्या समस्यांबाबत प्रत्यक्ष भेटून आपल्या समस्या सांगाव्यात. 

तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सातारा 

नक्की वाचा : Video : कानून के हात बडे लंबे हाेते है...इथं तर
 
जरुर वाचा : लढवय्या ते राजकीय मुत्सद्देगिर : शिवपुत्र छत्रपती राजाराम
 
हेही वाचा : अभिनेते मकरंद अनासपुरे यांची मुलाखत

loading image