दहावी अनुतीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना; आता तुमची परीक्षा होणार 'या' महिन्यात

मिलिंद देसाई
Wednesday, 12 August 2020

ऑनलाईन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शक करावे

बेळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे शिक्षण खात्यामार्फत सांगण्यात आले. अनुसुचीत जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी परीक्षा शुल्कापासुन सवलत देण्यात आली आहे. यावेळी दहावीच्या परीक्षेत अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देण्याची संधी मिळणार असुन मंगळवारपासुन ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. 

हेही वाचा-  बेळगावकरांना आस आता पॅसेंजर रेल्वेची -

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. 24 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केल्यास 200 रुपये दंड भरावा लागणार आहे. मात्र त्यानंतर दाखल झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शक करावे तसेच विद्यार्थ्यांची माहिती वेळेत पाठवुन द्यावी, अशा सुचना संबधित शाळा आणि मुख्याध्यापकांना केले आहेत.

सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षेवेळी 2011 ते 2017 पर्यंत सहा वेळा परीक्षा देऊन अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार नाही. या विद्यार्थ्यांना मार्च 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेवेळी खाजगी विद्यार्थी म्हणुन परीक्षा द्यावी लागणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरळीतरित्या पार पडावी यासाठी विभागावार अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हा, धारवाड आणि चिक्‍कोडीसाठी सहायक संचालक सीतालक्ष्मी यांची नेमणुक करण्यात आली आहे. अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी चलन भरुन वेळेत अर्ज दाखल करावेत असे आवाहन शिक्षण खात्याने केले. 

हेही वाचा- ठरलं एकदाचं...कोल्हापूर रोडवर उभारणार 200 बेडचे हॉस्पीटल..

अनुतिर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी असलेले शुल्क 
एक विषय - 320 रुपये 
दोन विषय - 386 रुपये 
तिन पेक्षा अधिक विषय - 520 रुपये 

"विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी सप्टेंबर महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. अनुतिर्ण विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाईन अर्ज दाखल करावेत तसेच अभ्यासाकडे लक्ष द्यावे." 

- ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supplementary exam of 10th students held on september in belgaum