शेतीपंपांसाठी वीजपुरवठा सुरळीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

सोलापूर - महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या स्रोतांकडून मागणीएवढी वीज उपलब्ध होत असल्याने सात मेपासून राज्यात कुठेही भारनियमन करावे लागत नाही. शनिवारपासून (ता.20) शेतीपंपासाठी पूर्वीप्रमाणे रात्री दहा तास, तर दिवसा आठ तास या पद्धतीने वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 

सोलापूर - महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या स्रोतांकडून मागणीएवढी वीज उपलब्ध होत असल्याने सात मेपासून राज्यात कुठेही भारनियमन करावे लागत नाही. शनिवारपासून (ता.20) शेतीपंपासाठी पूर्वीप्रमाणे रात्री दहा तास, तर दिवसा आठ तास या पद्धतीने वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 

विजेची उपलब्धता आणि मागणी याचा ताळमेळ घालण्यासाठी महावितरणने मे महिन्याच्या सुरवातीला काही दिवस वितरण व वाणिज्यिक हानी जास्त असलेल्या म्हणजे जी-3, जी-2, जी-1 एफ आणि ई अशा गटांमध्ये गरजेनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत भारनियमन केले होते. यातही अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे कमी वितरण व वाणिज्यिक हानी असलेल्या गटांच्या वाहिन्यांवर, तसेच शेती वाहिन्यांवर मर्यादित काळाकरिता भारनियमन करावे लागले होते. शेतीपंपांच्या वेळेमध्ये व उलब्धतेमध्ये 5 मेपासून बदल करून आठ तास वीजपुरवठा करण्यात येत होता. 

वीज उपलब्धतेत वाढ करण्यासाठी ऊर्जामंत्री व महाराष्ट्र सरकारने कोळसामंत्र्यांना विनंती करून कोळशाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करून घेतली. महावितरणने करार केलेले सर्व वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. द्विपक्षीय कराराद्वारे पाचशे मेगावॉट वीज उपलब्ध करून घाटघर विद्युतनिर्मिती केंद्राचा प्रभावी वापर आणि आवश्‍यक त्या काही तासांसाठी पॉवर एक्‍सचेंजमधून तीनशे ते एक हजार आठशे मेगावॉटपर्यंत वीज खरेदी करून विजेची तूट भरून काढली आहे. एप्रिल व मे या महिन्यात कमाल मागणी 19 हजार ते 19 हजार सहाशे मेगावॉटएवढी नोंदविली गेली होती. 

"सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध 
महावितरणने शेतीपंपाच्या वीजपुरवठ्याची वेळ रात्री दोन वाजताची केली होती. त्याबाबत 8 मे च्या "सकाळ'मध्ये "महावितरणने उडवली शेतकऱ्यांची झोप' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वेळी महावितरणने स्पष्टीकरण देत वेळेत केलेला हा बदल तात्पुरता असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. 

Web Title: Supply of power to agricultural pumps