सुशीलकुमार शिंदे करणार भाजपच्या विरोधात उपोषण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

देशात व राज्यात जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण केले जात आहेत. महाराष्ट्रातही भीमा-कोरेगाव येथे मराठा व दलित समाजात जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण केला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोलापूर : केंद्र व राज्य सरकारमधील भाजपच्या धोरणांचा निषेध म्हणून कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता. 9) उपोषण करणार आहेत. या उपोषणात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व कॉंग्रेसचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिली. 

सोमवारी सकाळी दहा वाजता चार हुतात्मा पुतळा येथे उपोषणास सुरवात होईल. आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार रामहरी रूपनवर, आमदार भारत भालके, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी खासदार धर्माण्णा सादूल, माजी आमदार निर्मला ठोकळ, दिलीप माने, विश्‍वनाथ चाकोते, प्रकाश यलगुलवार, जयवंतराव जगताप, प्रदेश कॉंग्रसेच सरचिटणीस धर्मा भोसले, अलका राठोड, नलिनी चंदेले, संजय हेमगड्डी, यू. एन. बेरिया, चेतन नरोटे सहभागी होणार आहेत. 

देशात व राज्यात जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण केले जात आहेत. महाराष्ट्रातही भीमा-कोरेगाव येथे मराठा व दलित समाजात जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण केला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. देश व राज्यातील सामाजिक सलोखा व शांतता बिघडली आहे. त्याच्या निषेधार्थ हे उपोषण करण्यात येणार आहे, असेही श्री. वाले म्हणाले. 

Web Title: Sushilkumar Shinde fast against BJP in Solapur