केतूर - सोलापूर-दौंड लोहमार्गावर जिंती रेल्वे रोड (ता. करमाळा) रेल्वे स्थानकावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीपैकी एका संशियत महिलेस रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत दौंड रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर लोहमार्गावर सिग्नलच्या वायर तोडून प्रवाशी रेल्वेगाड्या थांबवून गाडीतील प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील किमती ऐवजांची लूट केली जात असे. याची माहिती मिळाल्यावरून रेल्वे पोलिसांनी पाच पथके तयार करून सापळा रचला. वैशाली लाल्या काळे, झेलम सिकंद्य्रा काळे (वय 35), पांड्या गोरख काळे (वय 25), शामुल लाल्या काळे (वय 25), गोरख पांड्या भोसले हे रेल्वेगाडीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना पाहिले, पण ते सारे लगेचच पळाले. त्यांचा पाठलाग केला असता वैशाली काळे सापडली व इतर पळून जाण्यात यशस्वी झाले.
झडतीत आढळले 18 मोबाईल
संशयित महिला आरोपी वैशाली काळे हिची महिला पोलिस उपनिरीक्षक कोटिकवार यांनी झडती घेतली असता, तिच्याकडे 18 मोबाईल संच, एक जंबिया, एकरी फरशी कुराड, वायर तोडण्यासाठी वापरले जाणारे कटर, पाच बॅटऱ्या, एक्स ब्लेड, दोन अडकिते, पक्कड असा ऐवज मिळून आला. |
|