स्वाभिमानीची कॉंग्रेसबरोबर प्राथमिक बोलणी 

डी. आर. पाटील : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 30 जानेवारी 2017

जिल्हा परिषदेसाठी आघाडी : घडामोडींकडे कार्यकर्त्यांचे लक्ष 

जिल्हा परिषदेसाठी आघाडी : घडामोडींकडे कार्यकर्त्यांचे लक्ष 

शिरोळ : राज्यातील शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या खासदार राजू शेट्टींना होमपीच टिकवण्याकरिता आघाडी करावी लागत आहे. त्यांनी कॉंग्रेसबरोबर आघाडीसाठी प्राथमिक बोलणी केली आहेत. तसेच आगामी निवडणुकीत शिवसेना आमदार उल्हास पाटील यांच्या माध्यमातून तालुक्‍यात जिल्हा परिषदेत पक्षाचे खाते चालू ठेवण्याकरिता कोणाबरोबर आघाडी करणार याकडे लक्ष लागले आहे. 
स्वाभिमानी पक्ष राज्यात भाजपबरोबर सत्तेत सहभागी आहे. शेट्टींनी झेडपीसाठी भाजपकडे जिल्ह्यातील 22 जागांचा प्रस्ताव ठेवल्यानंतर भाजपने शेट्टींच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. भाजप दुर्लक्ष करीत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शेट्टींच्या शिलेदारांनी शिरोळ तालुक्‍यातील राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादीबरोबर प्राथमिक बोलणी सुरू केली आहेत. 
शिरोळ तालुक्‍यामध्ये जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीच्या चौदा जागा आहेत. पंचायत समितीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्चस्व आहे. खासदार शेट्टींचे होम पीच म्हणून शिरोळ तालुक्‍याकडे पाहिले जाते; मात्र विधानसभेच्या निवडणुकीत उल्हास पाटील शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभेत गेले. गेल्या चार महिन्यांत तालुक्‍यामध्ये राजकीय भूकंप घडविण्यात भाजप यशस्वी झाला आहे. जयसिंगपूर व कुरुंदवाड नगरपरिषदेत भाजपने प्रवेश केला आहे. 
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युतीबाबतचा प्रस्ताव देऊनही भाजप दुर्लक्ष करीत असल्याने शेट्टींनी राजकीय हालचाल सुरू केली आहे. शुक्रवारी कॉंग्रेस व राष्ट्रवादीबरोबर आघाडीची बोलणी सुरू केली आहेत. तीन, दोन, दोन असे पर्याय कॉंग्रेस- राष्ट्रवादीने पुढे केले असले तरी होम पीचवरील अस्तित्व टिकवण्याकरिता खासदार शेट्टी चार व तीनचा पर्याय पुढे करण्याची शक्‍यता आहे.  
 

Web Title: swabhimani congress meet and discussion