माढ्यासह खटाव-माणवर ‘स्वाभिमानी’चे लक्ष

आयाज मुल्ला
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

वडूज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माढा लोकसभा मतदारसंघासह खटाव-माण हा विधानसभा मतदारसंघ आपल्या निशाण्यावर ठेवला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत संघटनेला मिळालेली भरघोस मते व गेल्या काही महिन्यांत या मतदारसंघातपुरते राजकीय वातावरण ढवळून काढल्याची गोळाबेरीज करून स्वाभिमानी संघटना आता आगामी निवडणुकीत दिग्गजांना शह देण्याच्या तयारीत आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असले तरी केंद्र व राज्यातील भाजप सरकारमुळे मतदारसंघातील अन्य राजकीय पक्षांतही अस्वस्थता आहे. त्याचा फायदा घेण्याची तयारी अन्य राजकीय पक्षांनी केलेली आहे. त्यादृष्टीने मागील लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘स्वाभिमानी’ने सध्या मतदारसंघात मोर्चेबांधणी केली आहे.

‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेले दूधदराचे आंदोलन त्यादृष्टीने संघटनेला पूरक ठरल्याचे कार्यकर्ते मानतात. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी ‘एफआरपी’च्या ऊस आंदोलनाची पूर्व तयारी म्हणून या मतदारसंघात १४ ठिकाणी मेळावे घेऊन जोरदार वातावरणनिर्मिती केली.  

खटाव-माण विधानसभा मतदारसंघातही अन्य राजकीय पक्षांना शह देत ‘स्वाभिमानी’ने आपला प्रभाव दाखविण्यास सुरवात केलेली आहे. त्यादृष्टीने संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली या भागातील शेतकऱ्यांची साखर कारखान्यांकडून ऊस बिलाची रक्कम रखडल्यामुळे आंदोलन करून झलक दाखविली. या आंदोलनात खासदार शेट्टी यांनी स्वत: उतरण्याची तयारी दर्शविल्याने कार्यकर्त्यांत बळ संचारल्याचे दिसते.

गेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील जनतेने संघटनेवर विश्वास दाखवून दुसऱ्या क्रमांकाची भरघोस मते दिली. निवडणुकीनंतरही जनतेचा हा विश्वास संघटनेने कायम ठेवला आहे. गेल्या निवडणुकीतील पराभव आगामी निवडणुकीत येथील जनताच विजयात रूपांतरित करेल, असा विश्वास आहे.
- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetty Anil Pawar Politics