‘स्वाभिमानी’ रोखणार साखरेची वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

सातारा - जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांचे गाळप संपले आहे. पण, ऊस दराबाबत एकाही कारखान्याने नियम पाळलेला दिसत नाही. त्यामुळे सर्व साखर कारखाने बंद झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराचे आंदोलन सुरू करणार आहे. ज्या कारखान्यांनी दराबाबतचा शब्द पाळला नाही, अशा कारखान्यांची साखर रोखली जाणार आहे. 

सातारा - जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांचे गाळप संपले आहे. पण, ऊस दराबाबत एकाही कारखान्याने नियम पाळलेला दिसत नाही. त्यामुळे सर्व साखर कारखाने बंद झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराचे आंदोलन सुरू करणार आहे. ज्या कारखान्यांनी दराबाबतचा शब्द पाळला नाही, अशा कारखान्यांची साखर रोखली जाणार आहे. 

जिल्ह्यात १५ साखर कारखान्यांपैकी १४ कारखान्यांनी गाळप केले. त्यातील ११ कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे, तर उर्वरित तीन कारखान्यांचे गाळप अंतिम टप्प्यात आहे. साखर उतारा चांगला मिळाल्याने साखरनिर्मिती एक कोटी क्विंटलच्या घरात गेली आहे. त्यातच साखरेचे दरही पडले आहे. कारखाने सुरू होताना जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना आणि कारखान्यांचे प्रतिनिधींची ऊस दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. त्यामध्ये सर्वांनी एफआरपी अधिक २०० रुपये दर देण्याचे जाहीर केले होते. सुरवातील काही कारखान्यांनी हा तोडगा पाळून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसेही जमा केले.

पण, साखरेचे दर कोसळले आणि कारखान्यांनी ऊसदर देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता दराबाबत आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्याप ऊस शिल्लक आहे. हा सर्व ऊस गाळप झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराचे आंदोलन हाती घेईल.

दरम्यान, येत्या एक ते दहा मे या कालावधीत ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी हे विदर्भ-मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. या परिसरात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेऊन दिलासा देऊन त्यांचे प्रश्‍न जाणून घेणार आहेत. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाविरोधात भूमिका घेतली जाणार आहे. या दौऱ्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील संघटनेचे पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.

ऊसदराबाबत कारखान्यांनी दिलेला शब्द पाळावा. साखरेचे दर पडले म्हणून शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. सर्व कारखाने बंद झाल्यावर ऊसदरासाठी कारखान्यांच्या गेटवर आंदोलन करू. साखर भरलेला एकही ट्रक बाहेर जाऊन देणार नाही.
- सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: swabhimani shetkari sanghatana sugar transport stop agitation