esakal | सैनिकांच्या गावात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

बोलून बातमी शोधा

null

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विद्युत यंत्रणा विभाग यांच्या कामचुकारपणाचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. शेतकऱ्यांनी कृषी वीजबिल न भरण्याचे निर्णय घेऊन हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. 

सैनिकांच्या गावात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंगापूर (जि. सातारा) : ग्रामीण भागातील रस्त्यांचे काम निकृष्ट होत असल्याबद्दल वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत असल्याबद्दल व शेती पंपासाठी अन्यायकारक वीजबिल आकारणी व बेकायदेशीर वसुली थांबावी, या मागण्यांसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
 
महावितरणकडून घरगुती, तसेच कृषी पंपाच्या वीजबिलांच्या माध्यमातून चाललेली लूट त्वरित थांबवावी. कृषी पंपाच्या मीटरची रीडिंग घेणारी यंत्रणा गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वात नसतानाही शेतकऱ्यांना भरमसाट वीजबिल आकारणी करून त्याची जबरदस्तीने वसुली चालवली आहे. ती तत्काळ बंद करावी. यापूर्वीचे सर्व कृषी वीजबिल माफ करावे. बोरगाव- नांदगाव रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्याची चौकशी करावी. पोट ठेकेदाराऐवजी मूळ ठेकेदारानेच काम करावे. आतापर्यंत झालेल्या कामाच्या दर्जाची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा. तोपर्यंत काम बंद ठेवावे, तसेच 2017 ते आज अखेरपर्यंत संबंधित रस्त्यावर झालेल्या खर्चाची माहिती द्यावी, अशा मुद्द्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत भर उन्हात ठिय्या आंदोलन केले.
 
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता प्रशांत वाघ, नागठाणे शाखा अभियंता अजय ढगाले, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अरविंद शिंदे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. या वेळी दोन्ही विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी वीजबिल न भरण्याचे निर्णय घेऊन हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. 

पोट ठेकेदार आंदोलनात 

आंदोलनादरम्यान बोरगाव ते नांदगाव रस्त्याच्या निकृष्ट कामाचा पंचनामा ग्रामस्थांनी आंदोलनात केला. या वेळी या कामाचा पोट ठेकेदार आपल्या कुटुंबासह उपस्थित होता. त्यांच्या कुटुंबीयांनी वीज वितरण विरोधातील आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. नंतर निकृष्ट रस्त्याच्या विषयात उपस्थितांबरोबर तावातावाने भांडू लागल्याने एकच संभ्रम निर्माण झाला. याची खुमासदार चर्चा परिसरात रंगली. या मागचे नेमके गौडबंगाल काय? याचेच औत्सुक्‍य परिसरातील ग्रामस्थांत निर्माण झाले. 


वाचा : ...म्हणून त्यावेळी फडणवीस सरकारला घाम फुटला : पृथ्वीराज चव्हाण

हेही वाचा : हुतात्मा संदीप सावंत कुटुंबियांना 50 लाखांची मदत