'स्वच्छ भारत'चा सोलापुरात फज्जा

तात्या लांडगे
सोमवार, 3 डिसेंबर 2018

सोलापूर - महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्‍त झाल्याची घोषणा 31 मार्च 2018 रोजी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानुसार आहे त्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यानेदेखील हागणदारीमुक्‍तीची घोषणा केली. प्रत्यक्षात जिल्ह्याची कुटुंबसंख्या नऊ लाख 92 हजार इतकी असून, वैयक्‍तिक शौचालयांची संख्या पाच लाख 62 हजार आहे. यावरून चार लाख 30 हजार कुटुंबांकडे शौचालयेच नसल्याचे उघड झाले आहे. आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने हागणदारीमुक्‍तीसाठी जनजागृती केली जात आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधणीसाठी 12 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, या अनुदानातून तात्पुरत्या स्वरूपाची तयार शौचालये बसविण्याचा सपाटा प्रशासनाने लावल्याने जिल्हा हागणदारीमुक्‍त होण्यापूर्वीच तयार शौचालये मोडकळीस आल्याचे अथवा वापरात नसल्याचे दिसून येते. मोहोळ, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही.

दुसरीकडे नादुरुस्त सार्वजनिक शौचालये दुरुस्तीचे काम संबंधित ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगातून करावयाचे आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी प्रत्येक ग्रामपंचायतींना स्वच्छतेचा शाश्‍वत आराखडा तयार करावा, अशा सूचना केल्याचे स्वच्छ भारत अभियानाचे जिल्हा समन्वयक सचिन जाधव यांनी सांगितले.

कारवाई थंडावली
स्वच्छ भारत अभियानांतर्गत झालेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. ज्यांनी शौचालये बांधली नाहीत, अशा लोकांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक सार्वजनिक शौचालये बंद आहेत. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या प्रबोधनासाठी अथवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याकरिता नियुक्‍त केलेले "गुड मॉर्निंग' पथक व निगराणी समिती कागदावरच असल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्ह्याची स्थिती
लोकसंख्या - 46.23 लाख
कुटुंब संख्या - 9.92 लाख
वैयक्‍तिक शौचालये - 5.62 लाख
सार्वजनिक शौचालये - 423

Web Title: Swatch Bharat Issue Solapur