esakal | शिक्षक परिषद विरुद्ध महाआघाडी लढतीत "टीएडीएफ'चेही आव्हान; एक डिसेंबरला निवडणूक
sakal

बोलून बातमी शोधा

TADF also will challenge before teachers' council & other parties; elections on December 1

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतःचा म्हणजे महाआघाडीचा उमेदवार पूर्ण ताकदीने मैदानात उतरवणार आहे. शिवाय टीडीएफचाही उमेदवार असेल.

शिक्षक परिषद विरुद्ध महाआघाडी लढतीत "टीएडीएफ'चेही आव्हान; एक डिसेंबरला निवडणूक

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली  ः पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील शिक्षक परिषदेसमोर पुन्हा एकदा बंडखोर विद्यमान अपक्ष आमदार दत्तात्रय सावंत यांचे आव्हान असेल. या निवडणुकीत यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतःचा म्हणजे महाआघाडीचा उमेदवार पूर्ण ताकदीने मैदानात उतरवणार आहे. शिवाय टीडीएफचाही उमेदवार असेल. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी असेल. येत्या एक डिसेंबरला निवडणुका होणार असल्याचे आजच जाहीर झाल्या आहेत. 

या मतदारसंघात डावे समाजवादी आणि संघ परिवारामध्ये आजवर लढता होत आल्या आहेत. पुरोगाम्यांच्यावतीने टीडीएफच्या झेंड्याखाली उमेदवार असतो. यापूर्वी प्रा. गजेंद्र ऐनापुरे यांनी टीडीएफला या मतदारसंघात विजय मिळवून दिला होता. त्यांचा पराभव शिक्षक परिषदेचे भगवानराव साळुंखे यांनी केला. गतवेळी साळुंखे यांचा पराभव त्यांच्या तालमीत तयार झालेल्या दत्तात्रय सावंत यांनी केला. परिषेदेतील ही उभी फूट संघ परिवारासाठी धक्का होती. यावेळी परिषेदेने आधीच सोलापूरचे जितेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली असून या संघ आज्ञेबाहेर भगवनराव जाणार नाहीत हेही निश्‍चित आहे. त्यामुळे परिषदेचे पवार विरुद्ध दत्तात्रय सावंत यांच्यातील लढत आजघडीला निश्‍चित आहे. भगवानरावांनी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांची संघटना बांधून या मतदारसंघात परिषदेचा एकगठ्ठा मतदार तयार केला होता.

त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सावंत यांनी या विनाअनुदानित शिक्षकांच्या नेतृत्वाची धुरा आता आपल्या हाती घेतली आहे. गेल्या सहा वर्षांत त्यांनी सोबतीला आता मुख्याध्यापक, शिक्षक आणि क्‍लार्क यांना कृतिशील पुरस्कार द्यायचा सपाटा लावत पाचही जिल्ह्यांत मोठा संपर्क ठेवला आहे. सहा वर्षांत त्यांनी किमान पाच सहा हजार असे पुरस्कार वाटले असावेत. दुसरीकडे उत्तम नेटवर्क असलेल्या शिक्षक परिषदेने जितेंद्र पवार यांना उमेदवारी देत पूर्ण तयारीने आव्हान दिले आहे. 

या मतदारसंघात दीर्घकाळ वर्चस्व ठेवून असलेल्या टीचर्स डेमोक्रॅटीक फ्रंटकडून (टीडीएफ) आता कोल्हापूरमधील माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे नेते दादासाहेब लाड, आणि शिक्षक नेते बी. एम. पाटील असे दोघे कोल्हापूरमधून इच्छुक आहेत. त्यांच्याशिवाय पुण्याचे जी. के. पाटीलही टीडीएफच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत. टीडीएफचे परंपरेने उमेदवारीचे गुऱ्हाळ अद्यापही सुरूच आहे. 

पुणे विभागीय शिक्षक संचालक दिनकर पाटील यांच्या पत्नी रेखा यांनी अपक्ष म्हणून आधीपासूनच रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. विवेकानंद शिक्षक संस्थेत त्या सध्या लोणी काळभोर येथे कार्यरत असून, त्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लढायचेच या इराद्याने त्यांनी सातारा व पुणे जिल्ह्यातील संपर्क दौरेही सुरू केले आहेत. 

दोनवेळा या मतदारसंघातून पराभूत झालेले रयत परिवारातील मोहन राजमाने यांनी पुन्हा एकदा लढण्याची तयारी केली आहे. त्यांच्याशिवाय शिक्षक भारती संघटनेचे नेते आमदार कपिल पाटील यांनीही यावेळी या मतदारसंघात लक्ष घातले असून ते संघटनेचा उमेदवार देण्याच्या पवित्र्यात आहेत. गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्यावतीने पदवीधर आणि शिक्षक असे दोन्ही मतदारसंघ पूर्ण ताकदीने लढवण्याचे स्पष्ट संकेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना दिले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या आहेत. सध्या त्यांच्याकडे विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद आहे. त्यांच्या रुपाने प्रथमच संघ परिवारातील व्यक्तीकडे विवेकानंदचे मानद अध्यक्षपद आले होते मात्र आता राज्यातील सत्ताबदलामुळे आता हे पद त्यांच्याकडे मानापुरतेच उरले आहे. 

चुरस वाढली 
पाच जिल्ह्यांत सुमारे सत्तर हजार शिक्षक मतदारांची नोंदणी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यापैकी 35 टक्के मतदार होईल. प्रामुख्याने विनाअनुदानित कृती समितीचेच 15 हजार मतदार असतात. ही मंडळीच प्रामाणिकपणे जास्तीत जास्त मतदान करतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने प्रथमच या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आहे. त्यामुळे संघ परिवारापुढे मोठे आव्हान असेल. हा सारा हिशेब विचारात घेता ही निवडणूक पुन्हा एकदा चुरशीची होईल यात शंका नाही.

संपादन : युवराज यादव