घनकचरा प्रकल्पाचा विषय महासभेत घ्या : जयश्री पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

सांगली स्थायी समितीच्या येत्या सभेत 74 कोटींच्या घनकचरा प्रकल्पाचा विषय आला आहे. हा धोरणात्मक निर्णय असल्याने हा विषय स्थायी समितीला न घेता महासभेला घेणे आवश्‍यक आहे.

सांगली, ता. 30 : स्थायी समितीच्या येत्या सभेत 74 कोटींच्या घनकचरा प्रकल्पाचा विषय आला आहे. हा धोरणात्मक निर्णय असल्याने हा विषय स्थायी समितीला न घेता महासभेला घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मित्रपक्ष राष्ट्रवादीशी चर्चा करा आणि महापौरांना पत्र द्या, असे आदेश कॉंग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांनी नगरसेवकांना दिले. 

येत्या गुरुवारी ऑनलाईन होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत घनकचरा प्रकल्पाचा विषय आला आहे. याला कॉंग्रेसच्या सदस्यांचा विरोध आहे. यावर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी आज नेत्या जयश्री पाटील यांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, अभिजित भोसले, मनोज सरगर, मंगेश चव्हाण, उमेश पाटील, संजय मेंढे, प्रकाश मुळके, वर्षा निंबाळकर, आरती वळवडे, शुभांगी साळुंखे, कांचन कांबळे, रोहिणी पाटील, वहिदा नायकवडी यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक बैठकीला उपस्थित होते. 

उत्तम साखळकर म्हणाले, ""74 कोटींच्या घनकचरा प्रकल्पाचा विषय स्थायी समितीच्या बैठकीत आला आहे, मात्र हा विषय केवळ 74 कोटींचा नसून तो 110 कोटींपर्यंत जाणारा आहे. या महत्त्वाच्या विषयावर ऑनलाईन सभेत चर्चा होऊ शकणार नाही. अशा सभेत कुणाला बोलायची संधी द्यायची अन्‌ कुणाला नाही, याचे अधिकार सभेच्या अध्यक्षांकडे असतात. त्यामुळे सविस्तर चर्चा होत नाही. शिवाय हा विषय धोरणात्मक असल्याने तो महासभेला येणे आवश्‍यक आहे, तरीही सत्ताधाऱ्यांनी स्थायीला हा विषय आणला आहे. याला नगरसेवकांचा विरोध आहे.'' 

संतोष पाटील म्हणाले, ""घनकचरा प्रकल्प शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 72 कोटींच्या डीपीआरमध्ये काय आहे? याची माहिती नगरसेवकांना नाही. त्यामुळे या डीपीआरवर महासभेतच सविस्तर चर्चा झाल्यावरच त्याला मान्यता मिळणे आवश्‍यक आहे.'' नगरसेवक अभिजित भोसले म्हणाले, ""घनकचरा प्रकल्पावर सविस्तर चर्चा होणे आवश्‍यक आहे. पूर्वी प्रकल्पाला मान्यता घेताना तो 60 कोटींचा होता, पण आता नव्याने आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये हा प्रकल्प 72 कोटींवर गेला आहे. याला हरित न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीची मान्यता आहे की नाही? याची पाहणी करणे आवश्‍यक आहे.'' 

नगरसेवकांचे म्हणणे ऐकल्यानंतर जयश्री पाटील म्हणाल्या, ""शहराच्या दृष्टीने घनकचरा प्रकल्प होणे महत्त्वाचे आहे, पण त्यातील सर्व बाबी नगरसेवकांपुढे आल्या पाहिजेत. यात त्रुटी राहू नयेत, बोगसगिरी होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. हा विषय महासभेत सर्व नगरसेवकांसमोर यावा, त्यासाठी महापौरांना पत्र द्यावे, असे आदेश त्यांनी दिले. शिवाय मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशीही या विषयावर चर्चा करावी व महासभेतच हा विषय येण्यासाठी प्रयत्न करावेत,'' अशा सूचना जयश्री पाटील यांनी दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take the issue of solid waste project in the general body meeting: Jayashree Patil