तमाशाचाच तमाशा

तमाशाचाच तमाशा

कऱ्हाड - सोशल मीडियाचा वाढलेला वापर व विविध चॅनेलच्या आक्रमणामुळे लोकांची बदलत चाललेली आवड यामुळे तरुण पिढीने तमाशाकडे पाठ फिरवल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रसिद्ध असलेली तमाशा ही लोककला काळाच्या ओघात टिकते की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे बदल करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने तमाशा मंडळाच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे तमाशाचा ‘तमाशा’ झाल्याचे दिसते.

ग्रामीण भागातील यात्रांचे खास आकर्षण म्हणून तमाशा कलेकडे पाहिले जाते. पूर्वी तमाशा पाहण्यासाठी रसिकांची झुंबड उडायची. मनोरंजनातून सामाजिक संदेश देणारी ही कला काळाच्या ओघात बदल करत-करत सुरू ठेवण्याचा तमाशा फडमालकांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी खासगी सावकारी, बॅंका, पतसंस्थांची कर्जे काढून जीवतोड मेहनतही केली. त्यातून चार पैसे मिळायचे सोडाच, उलट खर्चच भागवताना फडमालकांच्या नाकीनऊ आले. सोशल मीडिया, देशासह परदेशी चॅनेलवरील मनोरंजानाच्या कार्यक्रमांचे आक्रमण आदींमुळे लोकांचा तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. टीव्ही व मोबाईलच्या जमान्यात तमाशा कलेकडे दुर्लक्ष होताना दिसते. 

त्यातूनही आपल्या मोडक्‍या-तोडक्‍या ज्ञानावर आणि वास्तववादी सौंदर्याच्या जिवावर उपस्थित रसिकांची मने जिंकण्याचा प्रामाणिक प्रयत्न कलाकार करताना दिसतात. मात्र, त्यांनाही आता तरुणांची पसंती मिळेनाशी झाली आहे. तरुण पिढीने तर तमाशाकडे पाठच फिरवल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राची लोककला टिकेल का नाही, याबाबत साशंकता व्‍यक्‍त होत आहे. 

‘राजा’वर मोलमजुरीची वेळ   
रसिकांचा तमाशाला मिळणारा तोकडा प्रसिसाद, आर्थिक संकट अशा अनेक कारणांमुळे गेल्या दोन ते तीन वर्षांच्या काळात अनेक तमाशाचे फड बंद झाले. सध्या सुरू असणाऱ्या तमाशा फडातील अनेक कलाकार वयोवृद्ध झालेत. त्यामुळे त्यांचे काम थांबवण्यात आले आहे. आयुष्यभर तमाशाची सेवा करूनही संबंधितांना चार पैसे साठवता आले नसल्याची अनेक कलाकारांची खंत आहे. त्यामुळे तमाशात ‘राजा’ म्हणून जगलेल्या अनेक कलाकारांवर आता जगण्यासाठी उतारवयात मोलमजुरीच करण्याची वेळ आली आहे. 
 

जिल्ह्यात २०० वर तमाशा मंडळांपैकी ७० मंडळेच सुरू 
बॉलिवुडच्या आक्रमणाने जुनी कला लोप पावण्याचा धोका 
आर्थिक संकटामुळे तमाशा मंडळांची घटतेय संख्या  
तमाशा मंडळांना आर्थिक मदतीसाठी शासनाचे दुर्लक्ष 
तरुणाईने पाठ फिरवल्याने रसिकांची वानवा 
खर्च अंगलट आल्याने अनेक फडमालक कर्जबाजारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com