'तंटे' संपले की 'मुक्ती' थांबली?

सचिन शिंदे
मंगळवार, 4 एप्रिल 2017

अभियानात यंदा नाही एकही गाव पात्र
राज्य शासनाने नऊ वर्षांपूर्वी 2007 मध्ये तंटामुक्त गाव अभियान सुरू केले. तत्कालीन गृहमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. नऊ वर्षांत त्याचा परिणाम दिसला. राज्यातील सुमारे 18 हजार 993 गावे तंटामुक्त झाली. एक हजार 298 गावांना 'तंटामुक्त'चा विशेष पुरस्कार मिळाला.

कऱ्हाड : राज्य शासनाने राबवलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात पश्‍चिम महाराष्ट्रात आदर्श ठरलेला सातारा पॅटर्न यंदा मागे पडला आहे. यंदा जिल्ह्यातून एकही गाव या अभियानात पात्र ठरलेले नाही. मागील वर्षी जिल्ह्यात सुमारे 36 गावांना अनुदान मिळाले होते. तीन गावांना पुरस्कार मिळाले होते. यंदा दाखल झालेला एकमेव प्रस्तावही समितीने नामंजूर केला आहे. त्यामुळे 'सातारा पॅटर्न' यंदा राज्याच्या यादीतून हद्दपार झाला आहे.

राज्य शासनाने नऊ वर्षांपूर्वी 2007 मध्ये तंटामुक्त गाव अभियान सुरू केले. तत्कालीन गृहमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. नऊ वर्षांत त्याचा परिणाम दिसला. राज्यातील सुमारे 18 हजार 993 गावे तंटामुक्त झाली. एक हजार 298 गावांना 'तंटामुक्त'चा विशेष पुरस्कार मिळाला.

गेल्या वर्षीपर्यंत साताऱ्याचा दबदबा
गतवर्षी राज्यातील 154 गावे तंटामुक्त झाली आहेत. त्यात जिल्ह्याचा सहभाग चांगला आहे. तीन गावांना 'तंटामुक्त'च्या पुरस्काराने गौरवण्यात आले. कऱ्हाड तालुक्‍यातील आटके, शेरे व वडगाव हवेली गावांना 19 लाख रुपयांचे बक्षीस अनुदान स्वरूपात मिळाले. त्याशिवाय जिल्ह्यातील चार हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या एक हजार 403 गावांना प्रत्येकी चार हजार व ज्या गावांची संख्या चार हजारपेक्षा जास्त आहे, अशा 100 गावांना प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे 16 लाख रुपये देण्यात आले आहेत. फलटणच्या सहा, कोरेगावच्या तीन, सातारा, माण व कऱ्हाड तालुक्‍यातील प्रत्येकी एक अशा जिल्ह्यातील 12 गावांना 'तंटामुक्त'तील शांतता पुरस्काराने गौरवण्यात आले.

संभाजीनगरचा प्रस्तावही नाकारला
तंटमुक्त गाव अभियानात पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वांत मजबूत स्थिती जिल्ह्याची होती. जिल्ह्यात झालेल्या कामाची माहिती घेण्यासाठी सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आदी वेगवेगळ्या भागातील लोक संबंधित गावांना भेट देवून जात होते. तोच 'सातारा पॅटर्न' यंदा 'तंटामुक्त'च्या यादीतून गायब झाला आहे. तंटामुक्त गाव अभियानाचे काम यंदा जिल्ह्यात कोठेच झालेले नाही. सातारा शहर पोलिस ठाण्यांतर्गत संभाजीनगर गावाचा एकमेव प्रस्ताव गेला होता. तोही समितीने नामंजूर केल्याने यंदा तंटामुक्त गाव अभियानाच्या यादीत सातारा जिल्हा नसेल. नऊ वर्षांत प्रथमची ही वेळ आली आहे. 'तंटामुक्त'चे काम पोलिस पाटील, ग्रामसेवक, पोलिस खाते व प्रत्येक गावातील तंटामुक्त समितीच्या समन्वयातून होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात या समन्वयाचा मोठा अभाव असल्याने यंदा मोट जुळू शकली नसल्याचे जाणकांराचे मत आहे.

तंटामुक्त समित्या कागदावरच!
जिल्ह्यातील 29 पोलिस ठाण्यांतर्गत समित्यांची स्थापना झाली आहे. मात्र, त्या केवळ कागदोपत्रीच राहिल्या आहेत. जिल्ह्यातील एक हजार 503 तंटामुक्त समित्या आहेत. मात्र, त्यांचे काम काहीच झालेले नाही, तेही पुढे येत आहे.

तीन जिल्हे 100 टक्के तंटामुक्त
शासनाने यंदा तंटामुक्त गाव अभियानासाठी तीन कोटी 95 लाखांची तरतूद केली आहे. त्यालाही जिल्हा मुकला आहे. साताऱ्यासह राज्यातील अन्य दहा जिल्ह्यांतून एकही गाव 'तंटामुक्त'साठी निवडलेले नाही. लातूर, भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यांतील गावे 100 टक्के तंटामुक्त झाल्याचे शासनाने जाहीर केले आहे. सांगली, ठाणे, रायगड, नंदुरबार, जालना, बीड, नांदेड, बुलढाणा, गडचिरोली व वर्धा अशा अन्य जिह्यांतूनही प्रस्ताव आलेले नाहीत.

Web Title: tantamukt gaon scheme ignored in satara