तारळे-जंगलवाडी घाट धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

तारळे -तारळे- जंगलवाडी रस्त्याची सलग दोन वर्षांच्या पावसात दारुण अवस्था झाली असून, घाट रस्त्यात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. याही वर्षी बांधकाम विभागाने नैमित्तिक डागडुजी व नालेसफाई न केल्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार मॉन्सूनपूर्व पावसात पुन्हा दरडी कोसळल्या असून, रस्त्यावर खडीमिश्रित माती व खडे व दगड आले आहेत. त्यामुळे येथून जाताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. 

जंगलवाडी, खडकवाडी व फडतरवाडी या गावांना तारळ्याशी जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. सहा दशकांनंतर झालेल्या रस्त्याच्या सोयीचे बांधकाम विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे गैरसोयीत रूपांतर झाले आहे. दोन तीन वर्षे मॉन्सूनच्या दमदार पावसामुळे रस्त्याची वाताहात झाली आहे. मुळातच देखभाल दुरुस्तीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची वाट लागली आहे. डोंगरावर राहणाऱ्या जंगलवाडी, खडकवाडी व फडतरवाडी या वाड्यांतील नागरिकांना तारळ्यात येण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या  निर्मितीनंतर या घाट रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे ठेकेदार व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. सध्या या घाटात पावसाचे पाणी वाहून जाण्यास नालेच नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून रस्ता खराब झाला आहे. नाल्यातील पाणी रस्त्याने वाहिल्याने रस्त्याच्या साइडपट्टीसह रस्ता धुऊन जाण्याच्या मार्गावर आहे. अनेक वळणांवर छोटे- मोठे खड्डे पडले आहेत, तर घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसात पुन्हा काही दरडी कोसळल्या, तर नाले मोडून पाणी रस्त्याने वाहिल्याने रस्त्यावर माती खडी तशीच राहिली आहे. दुचाकीसाठी तर एकदम धोकादायक स्थिती आहे. येथून वाहन चालविणेच अत्यंत धोकादायक झाले आहे. एका बाजूला तीव्र उतार, धोकादायक वळणे आहेत. संरक्षक कठडे नसल्यामुळे वाहने शेकडो मीटर खोल दरीत कोसळण्याचा धोका आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याकडे सातत्यपूर्ण केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त झाले असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांनी रस्त्याकडे लक्ष दिलेले नाही. ‘सकाळ’नेही दोन ते तीन वर्षे सातत्यपूर्ण आवाज उठवला, तरीही अधिकाऱ्यांवर काहीच फरक पडत नाही. 

- मधुकर साळुंखे, माजी सरपंच, खडकवाडी. 

Web Title: Tarle-Jangalwadi Ghat dangerous

टॅग्स