तासगावला सत्ताधाऱ्यांतूनच नाराजीचा सूर

Tasgaon-Nagarparishad
Tasgaon-Nagarparishad

तासगाव - तासगाव नगरपालिकेतील ५० लाखांच्या घोटाळ्याने राजकीय वळण घेतले असून सत्ताधारी भाजपामधूनच याविषयी नाराजीचा सूर उमटू लागला आहे, मनमानीचे प्रकार थांबवा, प्रसंगी राजीनामा देण्याची भाषा भाजपच्या कारभाऱ्यांनी सुरू केली आहे. खासदारांना भेटून घोटाळेबाजांच्या कारवाया कानावर घालण्यात येणार आहेत. इतक्‍या मोठ्या प्रमाणात  गैरप्रकार सुरू असूनही पक्षश्रेष्ठींनी मौन बाळगले आहे. 

कापूर ओढ्याचे सुशोभीकरण करून चौपाटी करण्याच्या गोंडस नावाखाली ७८ लाख रुपये खर्च झाल्याचा  आकडा प्रथमच बाहेर आल्याने तासगावकरांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. त्यातही तब्बल ३० लाख रुपये वाढीव बिल काढून तासगावकरांसमोर पारदर्शी आणि स्वच्छ कारभाराचा आदर्श समोर आला आहे. विशेष म्हणजे एवढे सारे होईपर्यंत सत्ताधारी भाजपाच्या कारभाऱ्यांपैकी ठरावीक एक दोघे वगळता बाकीच्यांना  या घोटाळ्याची माहिती सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी सदस्यांनी आवाज उठविल्यानंतर झाली.

नगराध्यक्षांच्या कक्षात झालेल्या गोंधळाच्यावेळीही उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला या विषयी काही माहिती नसल्याबद्दलची अस्वस्थता जाणवत होती. दरम्यान,  आता या विरोधात सूर उमटू लागला आहे. 

सत्ताधारी गटातील काही सहा ते सात नगरसेवक एकत्र आले असून त्यांनी खासदार संजयकाका पाटील यांना भेटण्याचा  निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात खासदारांच्या कानावर ‘कारनामे’ घालण्यात येणार आहेत.

आकडा वाढणार 
वाढीव बिलाला मंजुरी देण्याच्या ठरावामध्ये ६ कामे आहेत, त्यांपैकी १ काम कापूर ओढा चौपाटीकरणाचे आहे, तर दुसरे नारळ बागेतील रस्त्याचे आहे. या दोन कामांचेच ५० लाख झाले, उर्वरित ४ कामांची वाढीव बिले किती आहेत हा आकडा अजून बाहेर यायचा आहे.

आता सही नाही 
एका ओळीचे ठराव करून सत्ताधारी गटातील नगरसेवकांच्या सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या घेतल्या जातात. वाढीव बिलाचे प्रकरण उघडकीस आल्यावर त्या ठरावाला अनुमोदक असलेल्या नगरसेवकाला आपण कुठल्या ठरावावर सही केली हेच माहिती नव्हते. जेव्हा त्याला समजले तेव्हा त्याने  अक्षरशः डोक्‍यावर हात मारून आता परत कुठल्या ठरावावर सही करणार नाही असे त्याने सर्वांसमक्ष बोलून दाखविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com