तासगाव २३८ व्या रथोत्सवासाठी सज्ज

रवींद्र माने
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

तासगाव - तासगावसह राज्यातील गणेशभक्‍तांच्या दृष्टीने श्रद्धास्थान असणाऱ्या तासगावच्या उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या २३८ व्या रथोत्सवासाठी तासगाव नगरी सज्ज झाली आहे. २६ ऑगस्ट रोजी ऋषी पंचमीला होणाऱ्या रथोत्सवासाठी लाख भाविक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. रथोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

तासगाव - तासगावसह राज्यातील गणेशभक्‍तांच्या दृष्टीने श्रद्धास्थान असणाऱ्या तासगावच्या उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या २३८ व्या रथोत्सवासाठी तासगाव नगरी सज्ज झाली आहे. २६ ऑगस्ट रोजी ऋषी पंचमीला होणाऱ्या रथोत्सवासाठी लाख भाविक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. रथोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या उजव्या सोंडेच्या श्री सिद्धिविनायक गणपतींपैकी तासगावचा गणपती! मराठा साम्राज्याचे शेवटचे सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी गणपतीपुळे येथील गणेशाचे दुसरे स्थान म्हणून उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची प्रतिष्ठापना येथे केली. आख्यायिका अशी आहे की, परशुरामभाऊ हे गणपतीपुळे येथील गणपतीचे भक्‍त होते. ते पुळ्याच्या गणपतीचे दर्शन घेऊन मोहिमेवर निघत. तासगाव येथे स्थायिक झाल्यानंतर भाऊना दृष्टांत झाल्याने तासगावात श्रींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याप्रमाणे मंदिराचे बांधकाम सुरू केले. युद्ध मोहिमांमुळे दाक्षिणात्य मंदिर स्थापत्य त्यांच्या नजरेत भरले होते. पुण्याच्या पर्वतीवरील देवदेवेश्‍वर मंदिराचे शंकर पंचायतन त्यांना नेहमी आकृष्ट करीत होते. त्यामुळे त्यापद्धतीचे बांधकाम तासगावच्या गणपतीमंदिराचे करण्यात आले आहे. बांधकामासाठी कर्नाटक, राजस्थानातील ज्ञात, अज्ञात गवंडी, चित्रकार यांच्या परिश्रमातून श्रीसिद्धिविनायक  मंदिर सन १७७९ मध्ये पूर्ण झाले. त्याचवर्षी फाल्गुन शु.२ शके १७०१ यादिवशी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

दाक्षिणात्य पद्धतीचे ९६ फूट उंचीचे चुना आणि विटांत बांधलेले गोपुर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. असे दाक्षिणात्य पद्धतीचे गोपुर महाराष्ट्रात कोठेही आढळत नाही हे विशेष. परशुरामभाऊंनी या मंदिराशी भक्‍तांचे नाते भावनिक व धार्मिक स्तरावर न राहता मानवी क्रियाशीलतेचे अधिष्ठान मिळावे म्हणून श्री आणि भक्‍तातील अंतर राहू नये म्हणून भारतात दक्षिणेत रूढ असलेली रथयात्रेचे संकल्पना पुढे आणली. तीस फूट उंचीचा तीन मजली लाकडी रथ प्रतिवर्षी ऋषीपंचमी दिवशी हजारो भाविक हाताने ओढतात. ही प्रथा दोन अपवाद वगळता अव्याहत सुरू आहे. या रथात ‘श्रीं’ हे वडील श्रीकाशिविश्‍वेश्‍वर यांच्या भेटीसाठी ते जातात. तेथून ते परत माघारी फिरतात. दुसऱ्या मजल्यावर ‘श्रीं’ची मूर्ती ठेवलेली असते. रात्री पटवर्धन राजवाड्यात विसर्जन होऊन उत्सव संपतो. यंदा शनिवारी (ता.२६) होणारा रथोत्सव २३८ वा आहे. लोकमान्य टिळकांनी सन १८८५ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यापूर्वी १०६ वर्षे आधीच सर्वार्थाने सार्वजनिक असलेला असा हा तासगावचा रथोत्सव आणि लोकोत्सव महाराष्ट्रात एकमेव आहे.

Web Title: tasgaon news Rathotsav