तावडे हॉटेल परिसरात अतिक्रणावर हातोडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

कोल्हापूर - तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेने आज हातोडा चालविला. लोखंडी केबिन, पानपट्टीच्या टपऱ्या, डिजिटल बोर्ड, झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे मोहिमेत हटविण्यात आली. 

कोल्हापूर - तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेने आज हातोडा चालविला. लोखंडी केबिन, पानपट्टीच्या टपऱ्या, डिजिटल बोर्ड, झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे मोहिमेत हटविण्यात आली. 

शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून मार्चअखेर वाहतुकीला शिस्त लावण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाने ताराराणी चौक ते तावडे हॉटेलपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली. पोलिसांच्या फौजफाट्यासह विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले. तावडे हॉटेल परिसरातील विनापरवाना बोर्ड, होर्डिंग्ज, पानपट्टी टपऱ्या, स्वेटर व बॅग विक्रेत्यांची दुकाने, शेड, जनरल स्टोअर्स, बेकरीच्या मोठ्या केबिन हटवून शहराच्या प्रवेशद्वाराचा मुख्य चौक अतिक्रमणमुक्त करण्यात आला. पोलिस बंदोबस्तामुळे कारवाईला विरोध झाला नाही. ताराराणी चौक ते शिरोली जकातनाक्‍यापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले दहा डिजिटल बोर्ड, पानपट्टीच्या दहा टपऱ्या, चार गाड्या, जॅकेट व स्वेटर विक्रीचे शेड, हॅंन्डबॅग व गॉगल विक्रेत्यांची पंधरा शेड, चायनिज सेंटरच्या दोन गाड्या, तनवाणी बेकर्सचे अतिक्रमण काढून टाकण्यात आले. शासकीय विश्रामधाम परिसरातील खुल्या जागेतील तसेच सरकारी जागेतील लोखंडी केबिन, दहा झोपड्या काढून टाकण्यात आल्या. दिवसभर कारवाई सुरू होती. कनिष्ठ अभियंता बाबूराव दबडे, एम. जी. फुलारी, एस. पी. पाटील, पंडित पोवार, चंद्रकांत खांडेकर, विभागीय कार्यालयाकडील मेस्त्री, मुकादम, कर्मचारी, पोलिस उपनिरीक्षक वंजारी यांच्यासह शाहूपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी कारवाईत सहभागी झाले. उद्या (ता. 27) राजारामपुरी विभागीय कार्यालयाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढली जाणार आहेत. 

ती अतिक्रमणे काढणार का? 
"काही नगरी'च्या "सेवकां'च्या आशीर्वादाने अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर कारवाईचे धाडस अधिकारी दाखविणार का, असा सवाल नागरिकांतून होत आहे. महापालिकेतील अनुभवाचा वापर करून भागातील कार्यकर्ते सांभाळण्यासाठी मुख्य रस्त्याच्या बाजूला पक्की अतिक्रमणे करून दिली आहेत. शहरात पूर्वीही अतिक्रमण काढण्याची कारवाई अनेक वेळा झाली. मात्र, आठ दिवस उलटले की पुन्हा अतिक्रमण पूर्ववत होते. त्यामुळे आजपासून सुरू झालेली कारवाई दिखावा ठरते की यातून रिझल्ट मिळतो, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

Web Title: tawade hotel encroachment