तावडे हॉटेलजवळ कोंडी नित्याची

प्रवीण जाधव
मंगळवार, 3 जुलै 2018

गांधीनगर - पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूरचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे तावडे हॉटेल परिसर. सहा वेगवेगळे रस्ते एकत्र असल्याने परिसर वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. येथे सहा वेगवेगळे रस्ते मिळतात. वारंवार वाहतूक कोंडी होते. अनेकदा सेवा रस्त्यावरून महामार्गापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.

गांधीनगर - पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूरचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे तावडे हॉटेल परिसर. सहा वेगवेगळे रस्ते एकत्र असल्याने परिसर वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. येथे सहा वेगवेगळे रस्ते मिळतात. वारंवार वाहतूक कोंडी होते. अनेकदा सेवा रस्त्यावरून महामार्गापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.

मात्र, उपाययोजनेसाठी प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष घातले जात नाही.
प्रवासी वाहने, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या आदींनी गजबजलेला हा परिसर. एसटी, केएमटी आणि खासगी वाहनांचे थांबे या ठिकाणी आहेत. रोज हजारो वाहनांची वर्दळ चौकातून होत असते. कोल्हापूरहून पुण्याकडे जाताना वाहनचालकांना फारशी अडचण येत नाही; परंतु महामार्गाच्या पुलाखालून कोल्हापूर शहरात तसेच कागलकडे जाणाऱ्या वाहनांना आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून जावे लागते. 

महामार्ग रुंदीकरणावेळी उड्डाणपूल चुकीच्या पद्धतीने बांधला गेला आहे. जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी जाताना इतर अरुंद रस्ता कसा काय ठेवला गेला, असा प्रश्‍न वाहनधारकांना पडला आहे. कित्येकदा या ठिकाणी वाहतुकीची कोंडीही होते. गांधीनगर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पोलिस वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करतात. या ठिकाणी वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करणे गरजेचे आहे.

सीसीटीव्ही, सिग्नलची गरज 
तावडे हॉटेल परिसरात दिवसातून किमान एकदा तरी वाहतूक कोंडी होते. यामुळे वाहनचालकांची गैरसोय होते. बराच वेळ एका ठिकाणी वाहने थांबतात. त्यामुळे प्रदूषणाची पातळी याठिकाणी वाढलेली आहे. शहरात येणारा आणि बाहेर जाणारा मुख्य रस्ता आहे. याठिकाणी सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. तसेच सिग्नल यंत्रणा बसविली तर वाहतुकीची समस्या सुटू शकेल.

महामार्गावर बांधलेला पूल हा तांत्रिकदृष्ट्या अतिशय चुकीचा आहे. या पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याची रुंदी जास्त हवी होती. कमी रुंदीमुळे मोठी वाहने जाऊ शकत नाहीत आणि वारंवार वाहतूक कोंडी होऊन छोट्या-मोठ्या अपघातांची संख्या वाढत आहे. पावसाळ्याक या पुलाखाली पाणी साठते. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होते.
- शंकर वाधवाणी

Web Title: Tawade Hotel Traffic