दरड कोसळल्याने निपाणीजवळील तवंदी घाट बंद

राजेंद्र हजारे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

सततचा पाऊस आणि वेदगंगा, दूधगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून रस्त्यावर आल्याने निपाणी- कोल्हापूर हा महामार्ग गेल्या सहा दिवसांपासून बंद आहे. आज तवंदी घाटात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाण्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुंज लॉईड कंपनीच्या भरारी पथकाने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून निपाणी-बेळगाव महामार्ग वाहतूकीसाठी बंद केली आहे.

निपाणी  (काेल्हापुर) : सततचा पाऊस आणि वेदगंगा, दूधगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून रस्त्यावर आल्याने निपाणी- कोल्हापूर हा महामार्ग गेल्या सहा दिवसांपासून बंद आहे. आज तवंदी घाटात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाण्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुंज लॉईड कंपनीच्या भरारी पथकाने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून निपाणी-बेळगाव महामार्ग वाहतूकीसाठी बंद केली आहे.

त्यामुळे बेळगावकडून निपाणीकडे येणारी सर्वच वाहने शिरपूर  आणि म्हसोबा हिटणी फाट्याजवळ थांबून आहेत. रस्त्यावर पडलेले दगड डे कंपनीतर्फे हटविण्यात येत असले, तरी महामार्ग कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. 

दरम्यान, घाट परिसरात दरड कोसळणे यासाठी महामार्ग प्राधिकरणाने दगडांचे ढीग तारेच्या जाळीमध्ये लावले आहेत. त्यामुळे गेल्या बारा वर्षात तवंदी घाटात दरडी कोसळल्या नव्हत्या. शिवाय दरवर्षी त्यांची डागडुजीही केली जात होती. पण यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच तवंदी घाटातील दरडी कोसळू लागल्या आहेत. डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पाण्याचे लोंढे धबधब्याप्रमाणे रस्त्यावर वाहू लागले आहेत. त्यामुळे दरड खचून दगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोसळू लागले आहेत. त्यामुळे होणारी दुर्घटना लक्षात घेऊन सर्वच वाहने गोवावेस फाट्यावर अडविण्यात आली आहेत. याशिवाय निपाणी कडून संकेश्वरला जाणारी वाहने तवंदी घाटाच्या पायथ्याशीच थांबविण्यात आले आहेत.

यावेळी निपाणी शहर पोलीस ठाण्यातही घाट परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. परिणामी किरकोळ प्रमाणात शिपूर, तवंदी, कणगला, संकेश्वर कडे सुरू असलेली सर्वच वाहतूक खोळंबली आहे. 

दरम्यान, दरडी कोसळणे याबरोबरच डोंगराच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत आहे. त्याचाही वाहनधारकांना धोका होऊ शकतो. त्यामुळे चारचाकींसह दुचाकी वाहनांना घाटातून प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना नागरिकांनी पुढील पूर्वसूचना मिळेपर्यंत घाट मार्गात प्रवेश न करण्याच्या सूचना पुंज लॉईड कंपनी चहा भरारी पथकाकडून करण्यात आली आहे. एकंदरीत सहा दिवसांपासून कोल्हापूर- निपाणी हा महामार्ग बंद होता. त्यानंतर निपाणी बेळगाव हा महामार्ग बंद झाल्याने कोल्हापूर- बेळगाव महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. 

यमगरणी रस्त्यावर चार फूट पाणी
निपाणी-कोल्हापूर महामार्गावरील यमगरणी येथील वेदगंगा नदीला महापुर आला आहे. येथील पुलावर पाणी नसले तरी मांगुर फाट्याजवळील रस्त्यावर गेल्या सहा दिवसांपासून आठ ते दहा फूट पाणी होते. ते आज सकाळी कमी होऊन चार फुटावर आले आहे. आता कोकण फाट्यातून येणारे पाणी कमी झाल्यास सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यावरील पाणी कमी होऊन कोल्हापूर-निपाणी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. तरीही महसूल व पोलीस प्रशासनातर्फे आदेश आल्याशिवाय वाहनधारकांनी या रस्त्यावरून प्रवास करू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tawandi Ghat closed due to heavy rainfall and landslide