इंटरनेटच्या जमान्यात विद्यार्थ्यांना पत्रलेखनाची आवड लावणारा शिक्षक

students
students

अक्कलकोट - मागील दहा पंधरा वर्षापासून सतत वाढत चाललेल्या सोशल माध्यमाच्या जमान्यातही शाळेतुन सतत विद्यार्थ्यांना वेगवेगळे पत्रलेखन करावयास लावणारे ध्येयवेडे पत्रलेखक शिक्षक मयूर दंतकाळे यांचे कार्य मात्र अनुकरणीय व प्रेरणादायी असे आहे. मयूर हे बादोले ता.अक्कलकोट येथील के. पी. गायकवाड माध्यमिक शाळेत चित्रकला शिक्षक आहेत. लहानपणापासून पत्रलेखनाची आवड असणाऱ्या मयूर यांनी स्वतः सतत वेगवेगळ्या नातेवाईकांना पत्र पाठवीत असे. 

अभ्यासक्रमात पत्रलेखन विषय असणाऱ्या मुलात ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे रूजवावी असा विचार त्यांनी केला. त्यातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १५ विद्यार्थी आणि स्वतःचे एक असे सोळा पत्रे टाकली आणि त्याला परत पंतप्रधान कार्यालयातून अभिनंदन आणि शुभेच्छा देणारी पत्रे सर्वांना आली. त्यातून यांचा आनंद द्विगुणित झाला आणि तिथून मागील वर्षभरापासून ४५ ते ५० मान्यवरांना विद्यार्थ्यांकडून जवळपास १५०० पत्रे ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी पाठवली आणि त्याला उत्तरे देखील आली आहेत. या सर्व पत्रांचा संग्रह आणि स्कॅन देखील करून ठेवली आहेत. 

या कार्यास मुख्याध्यापक सुनील गुमास्ते व शिक्षक वृन्दाचे सहकार्य देखील मिळत आहे. आजपर्यंत शिक्षण मंत्री विनोद तावडे, डॉ भालचंद्र नेमाडे, डॉ विजय वाघ, पद्मश्री जादव पाइंग, पद्मश्री अरविंद गुप्ता, अभिनेता अतुल कुलकर्णी, अरविंद जगताप, प्रवीण दवणे, शि. द.फडणीस, विकास सबनीस, चारुहास पंडित, रवी परांजपे, अण्णा हजारे, डॉ विकास व प्रकाश आमटे, बैजू पाटील, जोत्स्ना गाडगीळ आदींसह विविध मान्यवरांना विद्यार्थ्यांकडून पत्रे पाठविण्यात आली. त्यांना उत्तरे देखील मिळाली त्यामुळे विद्यार्थी आनंदित आहेत. आणि पत्रलेखनाची कला देखील विकसित झाली आहे.इंटरनेट, जीमेल, व्हाट्सअॅप, फेसबुकच्या जमान्यात या शाळेतील विद्यार्थ्यांना दंतकाळे यांनी लावलेली पत्रलेखनाची आवड मात्र निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

माझे विद्यार्थी संवेदनशील, चांगले वाचक, चांगले लेखक, चांगली माणसे, चांगले चित्रकार बनावेत आणि त्यांच्या ज्ञानाची पातळी वाढावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. पूढे ही परंपरा चालूच ठेवणार आहे आणि पुढे या पत्रांचे संग्रह करून प्रदर्शन भरविणार आहे. इतर शाळांनाही प्रेरणा मिळावी असा माझा उद्देश आहे.
मयूर दंतकाळे, चित्रकला शिक्षक बादोले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com