'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द

teacher
teacher

सोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी येत्या मंगळवारपर्यंत (ता. 20) अतिरिक्त शिक्षकांना शाळेत रुजू करून न घेतलेल्या संस्थांमधील ती पदे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांची पदे रद्द होणार आहेत. 

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार अनेक अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त असलेल्या जागांवर समायोजन केले. मात्र, राज्यातील अनेक संस्थांनी त्या शिक्षकांना रुजू करून घेतले नाही. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी अनेकवेळा संबंधित संस्थांना पदे रद्द करण्याचा इशारा दिला होता. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याला संस्थांनी केराची टोपली दाखविली. मात्र, आता दस्तुरखुद्द अप्पर मुख्य सचिवांनीच हे आदेश दिल्यामुळे हजारो पदे रद्द होणार आहेत. 

एवढेच नाही तर ऑनलाइन समायोजनामध्ये अनेक ठिकाणी शिक्षक स्वतःहून रुजू झाले नाहीत. त्या शिक्षकांचा पगार थांबविण्याचे आदेशही कृष्णा यांनी दिले आहेत. ज्या संस्था अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून घेणार नाहीत, त्या संस्थांचे वेतनेतर अनुदानही बंद करण्याचे आदेश कृष्णा यांनी दिल्यामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. यंदाच्या वर्षी होणाऱ्या संचमान्यतेमध्ये काही ठिकाणी जादा पदे मंजूर झाली आहेत. त्या पदावरही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2017-18 या वर्षाचे समायोजन ऑनलाइन पद्धतीने न करता समुपदेशनाने व सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात यावे. हे करताना पारदर्शकता राहील, याचीही दक्षता घ्यायची आहे. जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही काही शिक्षक शिल्लक राहात असतील तर त्यांच्याकडून विकल्प घ्यावेत. जे शिक्षक विकल्प देणार नाहीत किंवा समायोजन झालेल्या ठिकाणी रुजू होणार नसतील तर त्यांचेही वेतन थांबविण्याचे आदेश दिले आहेत. 

5 डिसेंबरपर्यंत विषय संपवा 
अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्‍नांवर 12 नोव्हेंबरला झालेल्या "व्हीसी'मध्ये कृष्णा यांनी कोणत्याही परिस्थितीत येत्या 5 डिसेंबरपर्यंत हा प्रश्‍न संपविण्याचे आदेश दिले आहेत. व्हीसीसाठी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com