शिक्षक भरती आता गुणवत्तेनुसार!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

सातारा - शिक्षण विभागाने राज्यभरात शिक्षकांची भरती करण्यासाठी ‘पवित्र’ हे ऑनलाइन पोर्टल हे संकेतस्थळ सुरू करण्याला पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुहूर्त मिळाला. 

सातारा - शिक्षण विभागाने राज्यभरात शिक्षकांची भरती करण्यासाठी ‘पवित्र’ हे ऑनलाइन पोर्टल हे संकेतस्थळ सुरू करण्याला पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुहूर्त मिळाला. 

सोमवारपासून (ता. २) ते पोर्टल सुरू झाल्याने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेल्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राज्यस्तरावर गुणवत्तेनुसार भरती प्रक्रिया होणार असल्याने या पद्धतीत ‘पवित्र’ता वाढू शकेल. खासगी शिक्षण संस्था चालकांसाठी शिक्षक भरती म्हणजे ‘सोन्याचे अंडी देणारी कोंबडी’ ठरते. त्यामुळे सामान्य कुटुंबातील गुणवत्तांचे शिक्षक होण्याचे स्वप्न धुळीस मिळत होते, तर राजकीय ताकद असलेले ‘लाख’मोलाच्या ताकदीवर शिक्षक होत होते. त्यावर युती सरकारने टाच आणली आहे. राज्यस्तरावर शिक्षकांची भरती करण्यासाठी सरकारने ‘पवित्र’ पोर्टलची निर्मिती केली आहे. 

खासगी शैक्षणिक संस्था व शासनाच्या शैक्षणिक संस्थांत रिक्त शिक्षक पदांची भरती ही ऑनलाइन पद्धतीने होईल. त्यामुळे ‘डोनेशन’ (शैक्षणिक निधी) घेऊन नोकरीला लागणाऱ्या शिक्षकांना आळा बसू शकेल. जे शिक्षक ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण आहेत, त्यांनाच या पोर्टलवर नोकरी मिळविण्यासाठी अर्ज करता येईल. हा अर्ज भरताना उमेदवाराच्या ‘टीईटी’ परीक्षेतील अनुक्रमांक पवित्र पोर्टलवर युजर आयडी व पासवर्ड म्हणून वापरावा लागेल. तो अनुक्रमांक टाकल्याशिवाय अर्ज ओपन होत नाही. त्यामुळे ‘टीईटी’चा अनुक्रमांक उमेदवारांना माहिती असणे आवश्‍यक आहे. 

राज्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. ती पदे ऑनलाइन पद्धतीने भरण्यावर सरकारने लक्ष दिले होते. मात्र, हे संकेतस्थळ बहुतांश कालावधीत बंद होते. राज्याचे पावसाळी अधिवेशनात याबाबत प्रश्‍न उपस्थित होण्याची शक्‍यता होती. त्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण विभागाने हे संकेतस्थळ कार्यरत केले. ऑगस्टमध्ये शिक्षक भरती होणार असल्याची चर्चा सध्या शिक्षण विभागात सुरू आहे. त्यामुळे ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेल्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

ऑनलाइन अर्ज मुदतीकडे लक्ष
शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतील. मात्र, अर्ज कधीपर्यंत करावयाचे, याबाबत अद्याप शिक्षण विभागाने सूचना दिलेल्या नाहीत. या संकेतस्थळावर ‘लवकरच जास्तीत जास्त जागांची जाहिरात प्रसिद्ध करून हजारो बेरोजगारांची स्वप्नपूर्ती केली जाईल, नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल,’ असे नमूद केल्याने त्याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

Web Title: Teacher recruitment and merit