शिक्षक मतदारसंघ : टीडीएफ -शिक्षण परिषद दुफळीने त्रस्त 

जयसिंग कुंभार
Sunday, 8 November 2020

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून यावेळी शिक्षकांच्या म्हणवल्या जाणाऱ्या संघटनांना गटबाजीने कधी नव्हे इतके ग्रासले आहे.

सांगली ः पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून यावेळी शिक्षकांच्या म्हणवल्या जाणाऱ्या संघटनांना गटबाजीने कधी नव्हे इतके ग्रासले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील शिक्षक परिषद आणि पुरोगामी डाव्या-समाजवादी विचारधारेतील शिक्षक लोकशाही आघाडी (टीएडीएफ) या दोन्ही संघटनांमध्ये मोठी दुफळी माजली आहे. यावेळी या मतदारसंघात आमदार कपिल पाटील यांची शिक्षक भारती रिंगणात असू शकते. 

प्रा.गजेंद्र ऐनापुरे यांनी टीडीएफच्या माध्यमातून हा मतदारसंघ शिक्षक परिषदेकडून खेचला. त्यानंतर प्रा.ऐनापुरे यांना टीडीएफ मधून मोठा विरोध वाढत गेला. शिवाजीराव पाटील, जे. यु. नाना ठाकरे, विजय बहाळकर अशी मंडळी त्यावेळी टीडीएफचे नेतृत्व करीत असत. आता बहाळकर वगळता उर्वरित नेते मंडळी हयात नाहीत. शिक्षक संघटनांचे राजकारणच मोडीत निघत गेले आणि टीडीएफची घट्ट पकडही सैल झाली.

आजघडीला पुणे विभागात "टीडीएफ'चे नेतृत्व कोण करतेय याचे नेमके विधान करता येणार नाही. त्यामुळे उद्या टीडीएफचा उमेदवार जाहीर झाला तरी तो अधिकृत का अनधिकृत यावरून वाद न उफाळला तरच आश्‍चर्य. मुळात ही एक विविध विचारांच्या संघटनांची आघाडी आहे. राज्यात वेगवेगळ्या विभागात तचे नेते वेगवेगळे आहेत. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेत सलग सत्ता मिळवणारे नेते दादासाहेब लाड यांनी यावेळी टीडीएफची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मात्र पुण्यापासून सोलापूरपर्यंत जिल्ह्यात यावेळी टीडीएफचा मीच उमेदवार म्हणून लढणारे अनेकजण यावेळी रिंगणात असतील. 

दुसरीकडे शिक्षक परिषदेतही दुफळी माजली आहे. माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी परिषदेकडे उमेदवारी मागितली होती मात्र परिषदेने भाकरी परतण्याचा निर्णय घेत सोलापूरमधील जितेंद्र पवार यांना यापूर्वीच परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. भगवानरावांसोबत विनाअनुदानित शिक्षक कृती समितीत कार्यरत असणारे दत्तात्रय सावंत यांनीच गतवेळी बंडखोरी करीत भगवानरावांचा पराभव केला. ते परिषदेचेच उमेदवार मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा लढण्याची तयारी केली आहे. 

यानिमित्ताने शिक्षक संघटनांचे राजकारण मोडीत निघाल्याचे चित्र पुढे आले आहे. यावेळी प्रथमच कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचा शिक्षक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असू शकतो. कदाचित दोन्ही कॉंग्रेसच्या वाटणीत शिक्षक मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला जाऊ शकतो. त्यावेळी कॉंग्रेसची पसंती कोणाला हा देखील उत्सुकतेचा विषय असू शकतो.

शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळू शकते. कपिल पाटील यांच्या "शिक्षक भारती'ची उमेदवारीही निर्णायक असू शकेल. कॉंग्रेस आघाडीसोबत लढण्याचा त्यांचा इतिहास पाहता ते या मतदारसंघात कोणता निर्णय घेतात हे पहावे लागेल. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers Constituency: TDF - Shikshan Parishad is divided