अतिरिक्त शिक्षकांचे पगार नव्या शाळेतूनच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

कोल्हापूर - ज्या शाळेत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाले आहे, त्याच अर्थात नव्या शाळेतून पगार काढण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. अतिरिक्त शिक्षकांचा पगारबिलात समावेश करावा, तसे न केल्यास उर्वरित शिक्षकांचे पगारबिल स्वीकारू नये, असेही आदेश आहेत. माध्यमिकचे 118 आणि प्राथमिकचा एक अशा 119 शिक्षकांना या आदेशामुळे दिलासा मिळाला आहे. 

कोल्हापूर - ज्या शाळेत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाले आहे, त्याच अर्थात नव्या शाळेतून पगार काढण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. अतिरिक्त शिक्षकांचा पगारबिलात समावेश करावा, तसे न केल्यास उर्वरित शिक्षकांचे पगारबिल स्वीकारू नये, असेही आदेश आहेत. माध्यमिकचे 118 आणि प्राथमिकचा एक अशा 119 शिक्षकांना या आदेशामुळे दिलासा मिळाला आहे. 

अतिरिक्त शिक्षकांचा पगार रोखल्याने त्यांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. शिक्षण विभागाने नव्या शाळेतून पगार काढण्याचे आदेश देऊन अशा शिक्षकांना हजर न करून घेणाऱ्या संस्थाचालकांना मोठी चपराक बसली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशा शिक्षकांना संस्थाचालकांनी हजर करून घेतलेले नाही. जुनी शाळा ठेवून घेत नाही आणि नव्या शाळेत हजर करून घेतले जात नाही, अशी या शिक्षकांची अवस्था झाली आहे. संबंधित जागेवर नातेवाईक, कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याने अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेणे संस्थाचालकांच्या दृष्टीने अडचणीचे आहे. अतिरिक्त शिक्षकांचा पगार गेली अनेक वर्षे जुन्या शाळेतूनच निघत होता. पगार मिळतो; पण हाताला काम नाही आणि नवी शाळा हजर करून घेत नाही, अशा चक्रव्यूहात शिक्षक सापडले होते. शिक्षकांना हजर करून न घेतल्यास शासनाने ज्या शिक्षक पदाला मंजुरी दिली आहे ते पद रद्द करण्याचा इशारा दिला आहे. 

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्‍न शासनाने गांभीर्याने घेतला आहे. शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय नव्याने शिक्षक भरती करण्यास मनाई केली आहे. नोव्हेंबर 2016 अखेर अतिरिक्तांचे समायोजन करण्याची अखेरची मुदत होती. शिक्षकांचे पगार थांबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. 

निर्णयाकडे लागले होते लक्ष 
पगार रोखल्याने शिक्षकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कर्जाचे हप्ते तटले आहेत. अशा स्थितीत शिक्षण आयुक्त कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून राहिले होते. आयुक्तांनी यासंबंधीच्या अहवालावर काल स्वाक्षरी केली. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ज्या शाळांत पूर्वी झालेले आहे त्याच शाळेतून पगार निघतील. संबंधित शाळांना शिक्षकांच्या नावाचा समावेश करून पगारबिले सादर करावीत. शिक्षकांचा त्यात समावेश नसेल तर शाळेचे पगारबिल स्वीकारू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Teachers salary new school