तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

चटका उन्हाचा : आठ एप्रिलला ४२ डिग्री सेल्सिअस तापमानाची शक्‍यता

चटका उन्हाचा : आठ एप्रिलला ४२ डिग्री सेल्सिअस तापमानाची शक्‍यता
कोल्हापूर - यंदाच्या एप्रिल, मेमध्ये तापमानाचा अक्षरश: उच्चांक होईल, याची जणू चुणूकच गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरात वाढलेल्या तापमानाने दाखवून दिली. आज शहर परिसरातील तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसवर स्थिरावला. यामुळे दिवसभर वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे काहिली झाली. ३१ मार्चपर्यंत हे तापमान ४१ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाईल, असा अंदाज ॲक्‍युवेदर संकेतस्थळाने वर्तविला आहे. दोन एप्रिलला ४१, तर आठ एप्रिलला ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाईल. तसेच ३० एप्रिलपर्यंत हे तापमान ३८ ते ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत राहील, अशी शक्‍यताही वर्तविली आहे. यामुळे या वर्षीचा एप्रिल कमालीचा ‘हॉट’ राहील, हे निश्‍चित.   

तापमान ४० डिग्री सेल्सिअस झाल्यामुळे आज दिवसभर प्रचंड उकाडा जाणवला. आकाशात ढगांचे प्रमाण ४० टक्के होते. यामुळे सायंकाळी वळिवाचा शिडकावा होईल, अशी शक्‍यता होती; मात्र दुपारी तीननंतर ताशी १९ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागल्याने ढगांच्या पुंजक्‍यातील घनताही कमी झाली. हवेत ४५ टक्के आर्द्रता राहिली. दुपारी कातडी पोळून काढणाऱ्या उन्हामुळे रस्त्यावरील रहदारीही मंदावली. वाढत्या उन्हामुळे नेहमीप्रमाणे शीतपेयांची दुकाने, आउटलेटस्‌, लस्सी, सरबत विक्री, उसाचा रस, आइस्क्रीमच्या दुकानांत गर्दी वाढली. काही कामानिमित्त शहरात आलेल्या नागरिकांनी दुपारी बागांतील झाडांच्या सावलीत थोडा विसावा घेतला. उन्हामुळे शहरात जागोजागी गॉगल्स, टोप्या विकणाऱ्या स्टॉल्सची संख्या वाढली आहे. स्कार्फ, सनकोट, पांढरे सॉक्‍स, टोप्या, गॉगल विक्रीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आज घरोघरी फ्रीज असले तरी खास उन्हाळ्यानिमित्त वाळा टाकून पाणी पिण्यासाठी माठ विकत घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

आरोग्य सांभाळा
उन्हाळा सुरू झाला, की पाण्यात दूषितपणाही वाढतो. परिणामी, अमिबॉयसिस, डायरियाचे रुग्ण वाढतात. यामुळे शक्‍यतो पाणी उकळून थंड करून प्या. तापमान कितीही झाले तरी अतिथंड पाणी, बर्फाचे सेवन अतिप्रमाणात करू नका. दिवसभर कडक उन्ह, रात्री तापमान उतरत असल्याने येणारा शीतपणा, असे विचित्र वातावरण निर्माण होत असल्यामुळे आरोग्य सांभाळा, असा सल्ला अनेक डॉक्‍टरांनी दिला आहे.

Web Title: temperature increase in kolhapur