लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षकाला दहा वर्षे सक्तमजुरी 

लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षकाला दहा वर्षे सक्तमजुरी 

गडहिंग्लज - भादवण (ता. आजरा) येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने शिक्षक दिलीप तातोबा राजे (वय 54, मूळ रा. काटेभोगाव, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, सध्या रा. भादवण) याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमान्वये 55 हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली. येथील जिल्हा सत्र न्यायाधीश अनिरूद्ध प्रतिनिधी यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी सरकारतर्फे सरकारी वकील सुनिल तेली, ऍड. राजेश चव्हाण (कोल्हापूर) यांनी काम पाहिले. 

दरम्यान, पोस्को कायद्यातंर्गत झालेली या विभागातील ही दुसरी शिक्षा आहे. काही महिन्यापूर्वीच अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील आरोपीला शिक्षा झाली आहे. दिलीप राजे हायस्कूलमध्ये चित्रकलेचा शिक्षक आहे. पीडित मुलगी गावातीलच असून ती त्याची विद्यार्थिनी आहे. 12 ऑगस्ट 2017 ला चित्रकलेच्या क्‍लासनंतर "त्या' विद्यार्थीनीला थांबवून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्याबरोबरच लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. संबंधित मुलीच्या घरी हा प्रकार समजल्यानंतर मुलीच्या आईने राजेविरूद्ध तक्रार दिली होती. पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून आजरा पोलिसांनी तपास केला. याप्रकरणी राजेला अटक करून त्याच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

गडहिंग्लजचे जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. प्रतिनिधी यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासले. वैद्यकीय आणि परिस्थितीजन्य पुरावा, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची साक्ष आणि सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्या. प्रतिनिधी यांनी आरोपी राजे याला वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. 

पीडितेसह नातेवाईक फितूर 
पीडित मुलीसह चौघे नातेवाईक फितूर झाले होते; परंतु परिस्थितीजन्य पुरावा, डॉक्‍टरांचा अहवाल व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची साक्ष न्यायाधीशांनी ग्राह्य मानला. हा गुन्हा बाल लैंगिक अत्याचाराचा आहे. आरोपी शिक्षक असून कृत्याने त्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासली आहे. यामुळे त्याला अधिकाधिक शिक्षा ठोठावण्यासंदर्भात झालेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्या. प्रतिनिधी यांनी आरोपीला कडक शिक्षा सुनावल्याचे सरकारी वकील ऍड. चव्हाण यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com