वसंतदादा कारखाना, डिस्टिलरी भाडेपट्ट्याची अखेर निविदा जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

जिल्हा बॅंकेची कारवाई - 21 एप्रिल ते 3 मेपर्यंत मुदत - अर्जासाठी 20 हजार, बयाणा रक्कम एक कोटी

जिल्हा बॅंकेची कारवाई - 21 एप्रिल ते 3 मेपर्यंत मुदत - अर्जासाठी 20 हजार, बयाणा रक्कम एक कोटी
सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने 93 कोटी वसुलीसाठी वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय आज अखेर जाहीर केला. गेल्या महिन्यापासून रेंगाळलेली निविदा प्रक्रियेवर आज शिक्कामोर्तब झाले. वसंतदादा कारखाना तसेच डिस्टिलरी युनिट भाडेपट्ट्याने चालवण्यासाठी दिले जाणार आहे. 21 एप्रिल 2017 ते 3 मे 2017 कालावधीत इच्छुकांना निविदा दाखल करता येईल. निविदा अर्जाची किंमत वीस हजार, तर बयाणा रक्कम एक कोटी आहे.

वसंतदादा साखर कारखाना, डिस्टिलरी युनिटसाठी 8 मे 2017 रोजी निविदा उघडली जाईल, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, प्राधिकृत अधिकारी मानसिंग पाटील यांनी आज दिली. वसंतदादा साखर कारखान्यासाठी राजारामबापू सहकारी साखर कारखान्यासह अथणी शुगर, व्यंकटेश्वरा या खासगी कारखान्यातही स्पर्धा असेल.

"वसंतदादा'कडे जिल्हा बॅंकेची 93 कोटी येणेबाकी आहे. थकीत कर्जापोटी सिक्‍युरीटायझेशन कायद्याने साखर कारखाना जिल्हा बॅंकेने ताब्यात घेतला आहे. वसंतदादा कारखान्याकडील बॅंकांच्या देण्यांसह ऊस उत्पादक, कामगार, विविध शासकीय करांची रक्कम द्यावी लागणार आहे. सक्षम असलेला हा साखर कारखाना भाड्याने घेण्यासाठी स्पर्धक आले, तर त्यांच्याकडून हा कारखाना चांगला चालवण्याची आशा बॅंक प्रशासनाला आहे. कारखाना भाडेपट्ट्याने देण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे, नकाशा, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आज निविदा प्रसिद्ध केली. साखर कारखाना, डिस्टिलरीसाठी स्वतंत्र निविदा भरावी लागेल.

निविदेसाठी 21 एप्रिल ते 3 मे कालावधीपर्यंत मुदत आहे. निविदा अर्जाची किंमत 20 हजार रुपये आहे. कारखाना युनिटसाठी 1 कोटी आणि डिस्टिलरी युनिटसाठी 25 लाख रुपये बयाणा रक्कम आहे.
कारखाना, डिस्टिलरी युनिटसाठी जास्तीत जास्त निविदा रकमेचा उल्लेख टेंडर अर्जात करावा. निविदाधारकांना एक स्वतंत्र युनिट अगर दोन्ही युनिटसाठी दोन स्वतंत्र निविदा भरता येतील. जिल्हा बॅंकेकडे आलेल्या निविदा 8 मे रोजी दुपारी एक वाजता उघडली जाईल. निविदा अर्जाची मागणी करताना गेल्या पाच वर्षांत एकूण पाचशे कोटी रुपयांपेक्षा जादा आर्थिक उलाढालीचे चार्टर्ड अकौंटंटचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. निविदा स्वीकारणे, नाकारण्याचा अधिकार बॅंकेने राखून ठेवला आहे.

हे भाडेतत्वावर देणार...
"वसंतदादा'ची गाळप क्षमता प्रतिदिन साडेसात हजार टन आहे. प्रतिदिन 45 केएलपीडी क्षमतेचे डिस्टिलरी युनिट, इथेनॉल प्रतिदिन 25 केएलपीडी, ऍसिटालडिहाईड 450 टन, ऍसिटिक ऍसिड 525 टन, ऍसिटिक अनहायडॉईड 250 टन, कंट्रिलिकर बॉटलिंग प्रतिदिन बाराशे बॉक्‍स आणि फॉरेन लिकर प्रतिदिन सहाशे बॉक्‍स प्रकल्प कार्यान्वित असणारा प्रकल्प, मशिनरीसह वापरात असेल्या इमारती, गोदाम, सिव्हिल बांधकामे, इमारतीसह स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. त्या तत्वावर स्वतंत्ररित्या चालवण्यास दिले जाणार आहेत. इच्छुकांकडून लिफाफा बंद निविदा मागवल्या आहेत. निविदा प्रक्रियेबाबतच्या सर्व अटी आणि शर्थी निविदा अर्जात नमूद करण्यात आल्या आहेत.

Web Title: tender declare vasantdada sugar factory distilary department rent basis