सांगली सिव्हिलमध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

एक नजर

  • सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू.
  • प्रियांका सुनील चव्हाण (वय 21, रा. काकानगर) असे मृत महिलेचे नाव. 
  • मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घटना. 

सांगली - येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. प्रियांका सुनील चव्हाण (वय 21, रा. काकानगर) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. नातेवाईकांनी मंगळवारी रुग्णालय परिसरात गोंधळ घातला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त  ठेवण्यात आला. दरम्यान, मृत्यूबाबत रूग्णालय प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.  

आज सकाळी नऊ वाजता मृत्य प्रियांका चव्हाण यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात परिसरात गर्दी केली. डॉक्‍टरांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करीत रूग्णालयास घेराओ घातला. त्यानंतर शहर आणि विश्रामबाग पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दुपारपर्यंत हा गोंधळ सुरूच होता. त्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, रूग्णालय प्रशासनाने या प्रकरणाच्या चाैकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. संबंधित डॉक्‍टरांची चौकशी या समितीमार्फत करण्यात येत असल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tense situation after the death of pregnant woman in Sangli Civil