esakal | इस्लामपुरात पर्यायी स्मशानभूमीचा शोध सुरू! प्रशासन जागेच्या शोधात

बोलून बातमी शोधा

null

एकट्या एप्रिल महिन्यात १३२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ठेकेदार आणि त्याचे दोन सहकारी दिवसरात्र स्मशानभूमीतच राहून अहर्निश सेवा बजावत आहेत.

इस्लामपुरात पर्यायी स्मशानभूमीचा शोध सुरू! प्रशासन जागेच्या शोधात

sakal_logo
By
धर्मवीर पाटील,

इस्लामपूर (सांगली) : कोरोना (Corona) महामारीमुळे शहराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या कापूसखेड नाका रस्त्यावरील स्मशानभूमीवरील ताण वाढला आहे. पर्यायाने आणखी एका स्मशानभूमी (Cemetery)चा शोध सुरू झाला आहे. नगरसेवकांच्या तक्रारी वाढल्या असून पालिकेच्या सभेत त्याचे पडसाद उमटले. (Tensions have risen over the cemetery on kapuskhed naka road in islampur)

हेही वाचा: विहिरीत आढळलेल्या तरुणाचा खूनच; इचलकरंजी येथील घटना

एकट्या एप्रिल महिन्यात १३२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ठेकेदार आणि त्याचे दोन सहकारी दिवसरात्र स्मशानभूमीतच राहून अहर्निश सेवा बजावत आहेत. एक काळ असा होता की, इस्लामपूर नगरपालिकेने सुरू केलेली गॅस शवदाहिनी खूप महत्त्वाची भूमिका बजावत होती. राज्यभरातील पालिकांसाठी हा आदर्श प्रयोग ठरला होता, आणि काहीठिकाणी त्याचे अनुकरणही झाले. पण आताच्या स्थितीत शवदाहिनीत एका दिवसात दोनपेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे शक्य होत नसल्याची स्थिती आहे. शहरात जे कोविड सेंटर सुरू केले आहेत, त्याठिकाणी होणाऱ्या मृतांवर शहरातच अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे शासनाचे निर्देश असल्याने शहरातील स्मशानभूमीवरील ताण वाढला आहे.

हेही वाचा: इचलकरंजी  शहरातआणखी आठ लसीकरण केंद्रे 

कापूसखेडनाका स्मशानभूमी परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाला नुकतेच येथील स्मशानभूमी इतरत्र हलवावी अशी मागणी केली आहे. याशिवाय सध्या शहरात ज्या स्मशानभूमी आहेत, त्याच्याशेजारी लोकवस्तीचा भाग असल्यामुळे त्याठिकाणी कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी देऊ नये असा सूर आहे. त्यामुळे प्रशासनाच्या समोर पेच निर्माण झाला आहे. काही नगरसेवकांनी शहराच्या बाहेरील लगूनखड्डा-कचरा डेपो परिसरात स्मशानभूमी करावी, अशी मागणी केली आहे. कायमस्वरूपी कोविड रुग्णांसाठीच ही स्मशानभूमी असावी, असा आग्रह आहे. तशी जागा निश्चित करून प्रशासनाला तसा प्रस्ताव तयार करून मगच ही स्मशानभूमी जाहीर केली जाणार आहे.

पालिकेचा कौतुकास्पद निर्णय !

अंत्यसंस्कार खर्चात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन नगरपालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी संबंधित मृतांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन भरमसाट बिले द्यावी लागतात आणि इतके करूनही जर रुग्ण दगावलाच; तर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी रक्कम देतानाही त्रास व्हायचा कारण शहरातील नागरिकांना २१०० रुपये तर बाहेरील लोकांसाठी ही रक्कम ९००० रुपये इतकी होती. त्याऐवजी ती शहरासाठी १०००, तर बाहेरच्यांसाठी ३००० रुपये दर निश्चित करून दिलासा देण्याची भूमिका कौतुकास पात्र ठरली आहे.

"नागरिकांची व पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पर्यायी स्मशानभूमीचा शोध सुरू आहे. स्थानिकांना त्रास न होता मृतदेहांवर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार होतील यासाठी आमचे प्राधान्य असेल. "

- अरविंद माळी, मुख्याधिकारी.

"प्रशासनाने मृतांची वाढती संख्या विचारात घेऊन लोकांच्या जीवाशी खेळ न करता कचरा डेपो परिसरात तातडीने स्मशानभूमी विकसित करावी. "

- खंडेराव जाधव, नगरसेवक

(Tensions have risen over the cemetery on kapuskhed naka road in islampur)