दोन महिन्यांत ६७ घरफोड्या

शैलेश पेटकर
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सांगली - गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६७ घरफोड्या झाले आहेत. त्यात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. शहरातील भर वस्तीत घरफोड्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. 

सांगली - गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६७ घरफोड्या झाले आहेत. त्यात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. शहरातील भर वस्तीत घरफोड्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. 

अपार्टमेंटसह बंद बंगले, फ्लॅट सहज लक्ष्य केले जात आहेत. दरवाजाचे कडी कोयंडे आणि  खिडकीचे गज कापून चोऱ्या झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी हायड्रॉलिक जॅकच्या वापर केला आहे. ग्रामीण भागासह सांगली शहरातील विश्रामबाग, संजयनगर, कुपवाड, मिरज परिसरातील घरफोड्यांची संख्या सर्वाधिक आहे. जून-जुलै महिन्यातील ६७ घरफोड्यांपैकी पाच घरफोड्या दिवसाढवळ्या झाल्या आहेत. चोरटे बंद घरांवर पाळत ठेवून डाव साधत आहेत. सीसीटीव्हीमधील चित्रणाचा उपयोग करून काही चोरट्यांचा माग काढला गेला आहे; मात्र अनेक टोळ्या ‘सावध’ आहेत. त्यांनी पोलिसांच्या हाती धागेदोरे लागू नयेत, अशा पद्धतींचा शोध लावल्याचे दिसते. 

दरम्यान, पोलिसांनी काही घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत, मात्र ते प्रमाण कमी आहे. जतमध्ये सराईत दरोडेखोराला पोलिसांनी पकडले. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ४.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बिळाशी (ता. शिराळा) येथील घरफोडीचा छडा लावत साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. वाढत्या टोळ्या हे मोठे आव्हान आहे.

परगावी जाताना शेजारी, गस्ती पथकाला सांगावे. घरात दागिने व रोकड ठेवू नये. अधीक्षक सुहैल शर्मा, अपर अधीक्षक शशिकांत बोरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटींच्या बैठका घेतल्या जात आहे. सीसीटीव्हीसह सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी प्रबोधन केले जात आहे.
- श्रीकांत पिंगळे, निरीक्षक, एलसीबी

चोरटे डोईजड
जून, जुलै महिन्यात विश्रामबाग परिसरात घरफोड्यांचे प्रमाण अधिक आहे. चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. संजयनगर परिसरातूनही सहा लाखांच्या मुद्देमाल लंपास केला. वर्दळीच्या ठिकाणी होणारे हे प्रकार पोलिसांच्या कर्तबगारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे आहेत. चोरटे पोलिसांना चकवा देताहेत. सीसीटीव्हीचा रिसिव्हर चोरणे, मास्क लावणे, साहित्य जाळणे, श्‍वान पथकाला वास येऊ नये म्हणून तेथे परफ्युम फवारण्याचे प्रकार होताहेत. 

तलवार... नाही रे, कटावणी
मिरज तालुक्‍यातील एरंडोलीत चोरट्यांनी दोन व्हिडिओ कॅमेरे चोरले. ते सीसीटीव्हीत कैद झाले. एकाच्या हाती तलवार दिसत होती. मिरज ग्रामीण पोलिसांनी मात्र फिर्यादीला ‘तलवार नव्हे रे, ती कटावणी आहे’, असे सांगून गांभीर्य टाळले. चोरट्यांचे चित्र हाती असताना कारवाई का होत नाही?

Web Title: theft crime