लोकांचे पैसे बुडवण्यासाठी केला चोरीचा बनाव!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

मित्राकडून उसने घेतलेले पैसे बुडवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या डाळिंब पट्टीची रक्कम बुडवण्यासाठी एका व्यापाऱ्याने चोरी झाल्याचा बनाव केला व पोलिसांत फिर्यादही दिली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आतच फिर्यादी व्यापारीच आरोपी असल्याचे उघडकीस आणले आहे.

सोलापूर : मित्राकडून उसने घेतलेले पैसे तसेच डाळिंब व्यापाऱ्याकडून आलेली शेतकऱ्यांची रक्कम बुडविण्याच्या उद्देशाने शेटफळ (ता. मोहोळ) येथील व्यापाऱ्याने चोरट्यांनी लुटल्याचा बनाव केला होता. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास करून फिर्यादीच आरोपी असल्याचे उघडकीस आणले आहे.

हेही वाचा - चोरून नेलेली दुचाकी, मोबाईल पाहिजे असेल तर...

80 हजार लुटल्याची दिली फिर्याद
सौदागर समाधान भांगे (वय 30, रा. शेटफळ, ता. मोहोळ) असे आरोपीचे नाव आहे. भांगे याने मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याने 14 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता शेतकऱ्यांच्या डाळिंबाची पट्टी देण्याकरिता कोटक बॅंक शेटफळ येथून 50 हजार रुपये काढले होते. तसेच त्याच्याकडे 30 हजार रुपये होते. ही रक्कम घेऊन जीपमधून जाताना शेटफळ ते पोखरापूर रस्त्यावर तेलंगवाडी गावाच्या शिवारात तिघा चोरट्यांनी वाहन अडवले. चोरट्यांनी 80 हजार रुपये लुटले होते.

हेही वाचा - अजितदादांची समिती देणार शेतकऱ्यांना "गुडन्यूज'

पोलिसांनी आणला 24 तासांच्या आत गुन्हा उघडकीस
जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासाकरिता गेले. गुन्ह्यातील फिर्यादी सौदागर भांगे याच्याकडे चौकशी केली असता त्याने 14 जानेवारी रोजी शेटफळ येथील महिंद्रा कोटक बॅंकेतून पैसे काढल्याचे सांगितले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिंद्रा कोटक बॅंकेत जाऊन चौकशी केली; मात्र त्या दिवशी भांगे याने बॅंकेतून पैसे काढले नसल्याची माहिती समजली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भांगे याची अधिक चौकशी केली. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्‍वासात घेऊन चौकशी केल्यानंतर मित्र प्रताप थिटे याच्याकडून उसने घेतलेले पैसे बुडवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या डाळिंब पट्टीची रक्कम बुडवण्यासाठी चोरी झाल्याचा बनाव केल्याचे समोर आले. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत पोलिसांनी तो उघडकीस आणला आहे.

हेही वाचा - माढ्यात भाजपला खिंडार; साठे पित्रा-पुत्रांची घरवापसी

या पोलिस पथकाची कामगिरी
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली हवालदार खाजा मुजावर, नारायण गोलेकर, राजेश गायकवाड, संदीप काशीद, पोलिस नाईक सुभाष शेंडगे, चालक पोलिस नाईक केशव पवार यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft plan for money