#Crime : चोरून नेलेली दुचाकी, मोबाईल पाहिजे असेल तर...

परशुराम कोकणे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

प्रवीण हा गणपतीचे दर्शन घेऊन रस्त्याच्या कडेला मोबाईल पाहत थांबला होता. त्यावेळी तिघे तरुण तिथे आले. काठीने मारहाण करून प्रवीण यांच्याकडील तीनशे रुपयांची रोकड, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण 40 हजार तीनशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. 

सोलापूर : सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात गणपतीच्या दर्शनासाठी गेल्यानंतर तरुणास लूटमार करण्यात आली. चोरून नेलेली दुचाकी, मोबाईल पाहिजे असेल तर 40 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणात फौजदार चावडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

हेही वाचा - माहिती आहे का? 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!

काठीने मारहाण करून लुटले
शाहरुख गुड्डूभाई पटेल (वय 25, रा. विष्णू नगर, नई जिंदगी, सोलापूर), अमर सुधाकर जगताप (वय 23, रा. विजय नगर, मजरेवाडी, सोलापूर) या दोघांसह अन्य एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण राजवर्धन रत्नपारखे (वय 30, रा. यशवंत नगर, बाळे, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रवीण हा बॅंकेत शिपाई पदावर कामाला आहे. ही घटना 14 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गणपती घाट या ठिकाणी घडली. प्रवीण हा गणपतीचे दर्शन घेऊन रस्त्याच्या कडेला मोबाईल पाहत थांबला होता. त्यावेळी तिघे तरुण तिथे आले. काठीने मारहाण करून प्रवीण यांच्याकडील तीनशे रुपयांची रोकड, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण 40 हजार तीनशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. 

हेही वाचा -  अश्‍लील इमोजीमुळे अडकला फेसबुक फ्रेंड!

चोरीला गेलेल्या मोबाईलवरून आला फोन
या घटनेनंतर घाबरलेला जखमी प्रवीण उपचारासाठी घरी निघून गेला. 15 जानेवारी रोजी प्रवीण याने सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. त्याच दिवशी प्रवीणच्या भावाच्या मोबाईलवर चोरीला गेलेल्या प्रवीणच्या मोबाईल नंबर वरून फोन आला. दुचाकी, मोबाईल पाहिजे असेल तर 40 हजार रुपये घेऊन दत्त चौक या ठिकाणी घेऊन येण्यास सांगितले. प्रवीण आणि त्याच्या वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांनी कळविली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्य ओळखून लागलीच आरोपींना अटक करण्याचे नियोजन केले. 

हेही वाचा - लाचेची रक्कम कमी करण्यास नकार! पहिला हप्ता म्हणून घेतले..

पोलिसांनी लावला सापळा
पोलिसांच्या सूचनेनुसार प्रवीण आणि त्याचे वडील आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी पोचले. त्याठिकाणी पोलिसांनी सापळा लावला होता. पैसे घेण्यासाठी आलेल्या आरोपींपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने साथीदारांच्या मदतीने लूटमार केल्याचे सांगितले. पोलिसांनी इतर दोघांनाही अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery in Siddheshwar Temple area