वर्दळीच्या ठिकाणी धाडसी चोरी: चोरट्यांनी ४० तोळे दागिन्यांसह ७० हजार केले लंपास

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020


शहरात भीतीचे वातावरण

निपाणी (बेळगाव) : येथील निराळे गल्लीतील प्राध्यापकाच्या कुलूपबंद घरात असलेली तिजोरी उचकटून चोरट्यांनी ४० तोळे सोन्यासह ७० हजार रुपयांची रोकड लंपास केली. शुक्रवारी (ता. ११) सकाळी ही घटना उघडकीस आली. वर्दळीच्या ठिकाणी धाडसी चोरी झाल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,

निराळे गल्लीतील रहिवासी प्रा. संतोष ईश्वर कोळकी हे येथील व्हीएसएम शिक्षण संस्थेत म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी (ता. १०) सायंकाळी घराला कुलूप लावून ते कुटुंबीयासह कार्यक्रमानिमित्त संकेश्वर येथे गेले होते. नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. मुख्य घराचे कुलूप तोडून वरच्या मजल्यावरील दोन तिजोऱ्या कटावणीच्या साह्याने उचकटण्यात आल्या. त्यामधील ४० तोळे सोने व ७० हजार रुपयांची रोकड लंपास केली.

हेही वाचा- आणि हसन मुश्रीफ झाले भाऊक -

कोळकी कुटुंबीय शुक्रवारी (ता. ११) घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही चोरीची घटना उघडकीस आली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी बेळगाव येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. चारू हे श्वान घरापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत घुटमळले. पण चोरट्यांचा मार्ग सापडू शकला नाही. शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, गजानन भोई, राजू कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मध्यंतरी थांबलेल्या चोऱ्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of Rs 70,000 including 40 weights of jewellers in Nipani